बीड जिल्ह्यातून चारा वाहतूकीस प्रतिबंधाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, टंचाईस्थितीत उपाययोजना
By अनिल भंडारी | Published: September 7, 2023 05:43 PM2023-09-07T17:43:42+5:302023-09-07T17:44:33+5:30
कमी पर्जन्यमान झाल्याने भविष्यात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता
बीड : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने भविष्यात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात उत्पादीत होणारा तसेच सद्यस्थितीत असणारा वाळलेला व ओला चारा बीड जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास मनाई करणारा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी नुकताच जारी केला आहे.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाला हे आदेश प्राप्त झाले आहेत. मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार ३१ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्ह्यात १८६४५८.७७ मेट्रीक टन चारा शिल्लक असून तो अंदाजे ४३ दिवस पुरेल असा अनुमान आहे. चाऱ्याची उपलब्धता पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी इतर जिल्ह्यात चारा वाहतूकीबाबत मनाई हुकूम जारी केला.
काय आहे आदेश ?
बीड जिल्ह्यात उत्पादीत होणारा तसेच सद्यस्थतीत असणारा सर्व प्रकारचा वाळलेला व ओला चारा बीड जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास पुढील आदेशापर्यंत मनाई करण्यात येत असल्याचा आदेश, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी जारी केला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ, पोलिस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक, उपवन संरक्षक व जिल्हा शल्य चिकित्सकांना याबाबत सूचित करण्यात आले आहे.