राज्याच्या टास्क फोर्सच्या परवानगीनंतरच कॉलेज सुरू होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:38 AM2021-08-14T04:38:56+5:302021-08-14T04:38:56+5:30

बीड : कोविड प्रतिबंधक लस २५ टक्के प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवली तरच महाविद्यालये सुरू करता येतील. विद्यार्थी, पालक, ...

Colleges will start only after the permission of the state task force | राज्याच्या टास्क फोर्सच्या परवानगीनंतरच कॉलेज सुरू होतील

राज्याच्या टास्क फोर्सच्या परवानगीनंतरच कॉलेज सुरू होतील

Next

बीड : कोविड प्रतिबंधक लस २५ टक्के प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवली तरच महाविद्यालये सुरू करता येतील. विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य रक्षणाला प्राधान्य ठेवून जिल्हा आपत्ती प्राधिकरणाची शिफारस व राज्याच्या टास्क फोर्सच्या परवानगीनंतरच महाविद्यालये सुरू होतील, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

बीड येथे जिल्हा प्रशासनाकडे व्हेंटिलेटर लोकार्पणानंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोविड परिस्थिती पाहता प्रत्येक विभागात एकच एसओपी असेल, असे सांगता येत नाही. शक्यतो कॉलेज ऑनलाईन सुरू करावे लागतील. कोविडची दुसरी लाट थोपविण्यात जेथे यश आले, तेथे कॉलेज सुरू करण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटची जागा स्थलांतरित करण्याच्या हालचालीबद्दल विचारले असता, तेथे भेट देऊन माहिती घेतली जाईल. ती जागा बिल्डरच्या घशात जाऊ दिली जाणार नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली. शासकीय महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचा दावा सामंत यांनी यावेळी केला. मात्र, खासगी संस्थांमध्ये ३७ टक्के जागा रिक्त असून, त्या परिपूर्ण होण्यासाठी शासकीय यंत्रणा व संस्थाचालकांमार्फत प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. एमएसबीटीमार्फत राज्यात दहा ठिकाणी वर्ल्डक्लास पॉलिटेक्निक संकल्पना राबविली जाणार आहे. तेथे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम असेल, यासाठी गरज भासल्यास बीड जिल्ह्याची माहिती घेऊन पालकमंत्र्यांशी चर्चा करून १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाईल, असे सामंत म्हणाले. बीड जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या जागा ६०वरून ३०पर्यंत कमी केल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, मागील तीन वर्षातील सरासरी पाहून जागा भरल्या असतील तर त्या पूर्ववत करण्यात येतील, असे ते म्हणाले.

----------

शासन पाठिशी घालणार नाही

शिष्यवृत्ती गैरप्रकाराबाबत विद्यापीठाने नेमलेल्या समितीचे अहवाल प्रलंबित असून, शासनाने कोणालाही पाठिशी घातले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीचे ३११ कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून, इतर शिष्यवृत्ती अन्य विभागांच्या अखत्यारित असल्याचे ते म्हणाले.

----------

प्रत्येक कॉलेजमध्ये एनसीसी युनिट

राष्ट्रीय सेवा योजनेप्रमाणे सर्वच महाविद्यालयांमध्ये एनसीसी युनिट सुरू करण्याचा विचार असल्याचे सामंत यांनी सांगितले. सामाजिक कार्यासोबतच देशभक्तीचे एकत्र काम होऊन भावी पिढी आदर्श होईल. तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, शासकीय महाविद्यालयांतून ‘एमएसडब्ल्यू’ कोर्स सुरू करण्याचा विचार असून, यातून शिक्षित सामाजिक कार्यकर्ते निर्माण होतील जे कोणत्याही आपत्ती निवारणासाठी कामी येतील, असे ते म्हणाले.

-----------

Web Title: Colleges will start only after the permission of the state task force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.