'चल माझ्यासोबत, लग्न करू'; परीक्षा देऊन परतणाऱ्या दहावीच्या विद्यार्थीनीचा विनयभंग
By सोमनाथ खताळ | Published: March 4, 2023 06:27 PM2023-03-04T18:27:52+5:302023-03-04T18:29:17+5:30
पीडिता व आरोपी एकाच गल्लीत राहत असून एकाच ठिकाणी शिक्षणही घेत आहेत.
बीड : सलग चार ते पाच वर्षे पाठलाग करणाऱ्यांने २ मार्च रोजी दहावीची परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थीनीचा हात पकडून 'चल माझ्यासोबत, तुझ्या आई-वडिलांना लग्न करून द्या म्हणू' असे म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या आईलाही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बीड शहरातील एका महाविद्यालयाच्या आवारात घडली. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पाेलिसांनी आरोपीा अटक केली आहे.
पीडिता व आरोपी एकाच गल्लीत राहत असून एकाच ठिकाणी शिक्षणही घेत आहेत. २ मार्च रोजी सकाळी १० वाजता पीडिता दहावीच्या परिक्षेसाठी घराबाहेर पडली. यावेळी तो तिचा पाठलाग करत मागे आला. दुपारी २ वाजता पेपर संपल्यानंतर ती केंद्रातून बाहेर आली. यावेळी आरोपी देखील बाहेर उभाच होता. त्याने तिचा हात पकडला. 'चल माझ्यासोबत. आपण तुझ्या घरी जावू आणि तुझ्या आई-वडिलांना लग्न करून द्या, असे म्हणू' असे म्हणत तिच्याशी हुज्जत घालू लागला. पीडितेना झटका मारून त्याच्या हातातून हात सोडला. नंतर ती घराच्या दिशेने जात असतानाही तो मागे आला. याचवेळी पीडितेची आई तेथे आली. तिने आरोपीला जाब विचारताच त्याने त्यांनाही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने आई-वडिलांसह बीड शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी डीबी पथकामार्फत आरोपीचा शोध सुरू केला. अवघ्या तासाभरात जुना बाजार परिसरातून अटक केली. ही कारवाई बाळासाहेब सिरसाट, अशपाक सय्यद, मनोज परजणे आदींनी केली.