दिलासा ! बीड जिल्ह्यात ७ व ९ मे रोजी बॅँका शिथिल वेळेत सुरु राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 04:45 PM2020-05-06T16:45:15+5:302020-05-06T16:45:54+5:30
नागरिकांची अडचण होणार दूर
बीड : बुध्द पौर्णिमा आणि दुसरा शनिवार नेमके विषम तारखेस संचारबंदी शिथिल दिवशी असल्याने ७ व ९ मे रोजी जिल्ह्यातील सर्व बॅँका संचारबंदीच्या शिथिल कालावधीत चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी दुपारी जारी केले.
केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार ७ मे रोजी बुध्द पौर्णिमा व ९ मे रोजी दुसरा शनिवारनिमित्त सुटी असल्याने दोन दिवस बॅँका बंद राहणार आहेत. दोन्ही विषम दिनांकास बॅँका बंद राहिल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बॅँकांना हे निर्देश दिले आहेत. ७ व ९ मे रोजी बीड जिल्ह्यातील सर्व बॅँका संचारबंदीच्या शिथिल कालावधीत चालू ठेवाव्यात. तसेच सक्षम प्राधिकाऱ्याकडून पास घेतलेल्या संबंधित व्यक्तींना बॅँकेच्या सर्व सोई-सुविधा या तारखांना बॅँकेच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात याव्यात. सुटीच्या कारणामुळे बाधा येऊ न देता या आधीच्या आदेशाप्रमाणेच बॅँकांचे कामकाज चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक गरज असणाऱ्या ग्राहकांची बॅँकांमध्ये संचारबंदी शिथिल कालावधीत गर्दी होत आहे. महिन्याचा पहिला आठवडा असल्याने गरजपूर्तीसाठी लागणारी रक्कम काढण्यासाठी ही गर्दी होत आहे. घाटनांदूरमध्ये तर पहाटेपासूनच बॅँकेसमोर खातेदारांची रांग लागली होती. तसेच बुध्द पौर्णिमेनिमित्त बॅँक बंद राहतील यामुळे ५ मे रोजी संचारबंदी शिथिल कालावधीत जिल्ह्यातील बहुतांश बॅँकांमध्ये मोठी गर्दी पहायला मिळाली होती. त्यामुळे नागरिकांची अडचण दूर व्हावी म्हणून ७ व ९ मे रोजी बॅँका चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.