दिलासादायक; तीन वर्षांत डेंग्यूचा एकही बळी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:08+5:302021-05-16T04:33:08+5:30
राष्ट्रीय डेंग्यू दिन बीड : जिल्ह्यात मागील तीन वर्षांत डेंग्यूमुळे एकही मृत्यू झाला नसल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे, असे ...
राष्ट्रीय डेंग्यू दिन
बीड : जिल्ह्यात मागील तीन वर्षांत डेंग्यूमुळे एकही मृत्यू झाला नसल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे, असे असले तरी ५०४ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यावरून आरोग्य विभागाला डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात यश येत असल्याचे दिसत आहे. यावर्षी ‘डेंग्यूला प्रतिबंध करू या, सुरुवात घरापासून करू या’ हे घोषवाक्य घेऊन राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे.
१६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने प्रत्येक वर्षी जनजागृती केली जाते. याचा परिणामही जाणवत आहे. डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. याचा प्रसार एडिस इजिप्टाय डासाच्या मादीमार्फत होतो. त्याची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. एक डास एकावेळी १५० ते २०० अंडी घालते. त्यामुळे डासांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो. हा रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन केले जाते, तसेच पाणी साठ्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यासह ते तपासणीसाठी घेतले जातात. ज्यांना ताप आहे, अशांचे नमुने घेऊन तपासणी केली जाते. रुग्ण निष्पन्न होताच तात्काळ उपचार करून त्या भागात उपाययोजना केल्या जातात. त्यामुळेच मागील तीन वर्षांत जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद नाही. ही बाब दिलासा देणारी आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मिर्झा साजीद बेग व सर्व कार्यालय यासाठी परिश्रम घेत आहेत.
येथून होते डासांची उत्पत्ती
सिमेंट टाक्या, रांजण, प्लास्टिक रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, घरातील शोभेच्या कुंड्या, निरुपयोगी वस्तू, टायर्स, कूलर या ठिकाणांहून डासांची उत्पत्ती होते.
...अशी आहेत लक्षणे
डेंग्यू ताप आजारात २ ते ७ दिवस तीव्र स्वरूपाचा ताप येतो. डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायूदुखी, असा त्रास होतो. उलट्या होणे, डोळ्याच्या आतील बाजूस दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक व तोंडातून रक्तस्राव होणे, अशक्तपणा जाणवणे, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.
कोरोनामुळे तपासण्या घटल्या
मागील वर्षापासून कोरोनाने थैमान मांडले आहे. त्यामुळे मागील वर्षात केवळ २४९ लोकांची तपासणी केली. यात ३९ जण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले होते. २०१९ मध्ये १,०३८ तपासणी केल्या, यात १८८ पॉझिटिव्ह आढळले, तर २०१८ मध्ये १,५७७ लोकांची तपासणी केली असता २७३ जण पॉझिटिव्ह आढळले होते. चालू वर्षात आतापर्यंत ३७ संशयितांची तपासणी केली असून, केवळ १ जण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळला आहे. या तीनही वर्षात एकही मृत्यू नाही.
....
मागील तीन वर्षांत जिल्ह्यात एकाचाही डेंग्यूमुळे मृत्यू नाही, ही बाब दिलासा देणारी आहे, तसेच नवे रुग्ण शोधून त्यांना औषधोपचार करण्यात आले. आम्ही तर उपाययोजना करतोच; परंतु नागरिकांनीही एक दिवस कोरडा पाळून योग्य ती काळजी घ्यावी. लक्षणे जाणवताच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. मिर्झा साजीद बेग, जिल्हा हिवताप अधिकारी, बीड
---