ग्राहक म्हणून आल्या अन् सोन्याच्या बांगड्या घेऊन गेल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 06:26 PM2018-09-19T18:26:10+5:302018-09-19T18:31:02+5:30
सेल्समनची नजर चुकवून व आपल्या हातचालाखीने १ लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या घेऊन पसार झाल्या.
बीड: बुरखाधारी दोन महिला ग्राहक म्हणून दुकानात आल्या. सोने खरेदीचा बहाणा केला. सेल्समनची नजर चुकवून व आपल्या हातचालाखीने १ लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या घेऊन पसार झाल्या. हा प्रकार सुभाष रोडवरील पु.ना.गाडगीळ सराफा दुकानात घडला. यापक्ररणी दोन महिलांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
नितिन मुळे या सेल्समनच्या फिर्यादीनुसार तो १७ सप्टेंबर रोजी सकाळी दुकानात आला. सायंकाळी ५.३० वाजता दोन बुरखाधारी महिला दुकानात आल्या. त्यांनी बांगड्या खरेदी करायच्या सांगून अनेक आकर्षक बांगड्यांची पाहणी केली. याचवेळी त्यांनी हातचालाखी करून दोन बांगड्या बुरख्याआड धरल्या. त्यानंतर ५.४५ वाजता बांगड्या आवडल्या नाही, म्हणून त्या बाहेर पडल्या. रात्री सोने मोजत असताना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मंगळवारी यासंदर्भात बीड शहर पोलीस ठाण्यात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, पोउपनि मनिषत्त जोगदंड, जाधव यांनी तात्काळ दुकानात धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले. बुधवारी उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काही लागले नव्हते.