घराकडे येतोय, फोनवर सांगून तो आलाच नाही; सकाळी सापडला मृतदेह, जवळ आढळले पिस्तुल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 11:59 AM2022-06-08T11:59:44+5:302022-06-08T12:16:39+5:30
बीडमध्ये तरुणाच्या मृतदेहाजवळ गावठी पिस्तूल, हत्या की आत्महत्या
बीड: शहरातील स्वराज्यनगर भागात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने ८ जून रोजी सकाळी एकच खळबळ उडाली. मृतदेहाजवळ गावठी पिस्तूल मिळून आले आहे. त्यामुळे हत्या की आत्महत्या याचे गूढ कायम आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय कोंडीराम भांडवले (२०,रा.बार्शी नाका, तेलगाव रोड, बीड) असे मयताचे नाव आहे. तो शहरातील एका ऑइल मिलमध्ये काम करायचा. ७ जून रोजी रात्री तो नित्याप्रमाणे घरी पोहोचला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी रात्री साडेआठ वाजता संपर्क केला. यावेळी घरी यायला किती वेळ आहे, असे आईने विचारले असता, घराकडे येत आहे, असे त्याने सांगितले. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. रात्री ११ वाजेनंतर तो फोनही घेईना, त्यामुळे कुटुंबीयांनी मित्रपरिवार, ऑइल मिल व नातेवाईकांकडे चौकशी केली, पण त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
अखेर ८ जून रोजी सकाळी सात वाजता स्वराज्यनगरातील रिकाम्या भूखंडातील दाट झाडीत त्याचा मृतदेह आढळून आला. शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि.केतन राठोड, सहायक निरीक्षक मनोजकुमार लोंढे, पो.ना.रवि आघाव, गणेश परजणे, विठ्ठल शिंदे, भगवान घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान, त्याच्या डोक्याला दोन्ही बाजूंनी छिद्र आहे. त्यामुळे खून की आत्महत्या, याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
दुचाकीवरील पार्सलच्या पट्टीने पटली ओळख
घटनास्थळी अक्षय भांडवले याची दुचाकी आढळली. नंबरप्लेटवर ऑनलाइन मागविलेल्या पार्सलच्या नावाची पट्टी डकवलेली होती. त्यावरील नावावरुन ओळख पटली. तेथे एक गावठी पिस्तूल मिळून आली. ती जप्त केली आहे. अक्षयच्या मृत्यूने कुटुंब शोकमग्न झाले आहे.