कर्ज स्वरूपात दिलेल्या रेमडेसिविरच्या वसुलीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:53+5:302021-06-10T04:22:53+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयातील खासगी रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन कर्ज स्वरूपात देण्यात आले होते. आता बाजारात हे इंजेक्शन उपलब्ध झाले ...
बीड : जिल्हा रुग्णालयातील खासगी रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन कर्ज स्वरूपात देण्यात आले होते. आता बाजारात हे इंजेक्शन उपलब्ध झाले असून, मागणीही कमी झाली आहे, त्यामुळे आता दिलेल्या इंजेक्शनची वसुली करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत पत्र काढले असून, इंजेक्शन परत करण्याच्या सूचना सर्वांनाच दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रुग्णासह न्यूमोनियाच्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी ठरत असल्याचे आरोग्य विभागाने काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत होता. मार्च व एप्रिल महिन्यात यासाठी सर्वांनाच त्रास झाला. खासगी रुग्णालयांना तर इंजेक्शनच मिळत नव्हते. ज्यांच्याकडे उपलब्ध होते, त्यांनी चढ्या भावाने ते विक्री करून रुग्णांची आर्थिक लूट केल्याच्या तक्रारी होत्या. हाच धागा पकडून जिल्हा रुग्णालयाकडून खासगी रुग्णालयांना कर्ज स्वरूपात इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे सामान्य रुग्णांना इंजेक्शन मिळाले होते. आता हे इंजेक्शन बाजारात उपलब्ध झाले आहे, तसेच मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे दिलेले इंजेक्शन परत घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी सर्वांना पत्र काढले असून, इंजेक्शन परत करण्याबाबत सांगितले आहे. आता कोण किती लवकर इंजेक्शन परत करते, याकडे लक्ष लागले आहे.