राष्ट्रकुल पदक विजेत्या अविनाशला आर्थिक मदत मिळावी; आईवडिलांची राज्य शासनाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 05:13 PM2022-08-19T17:13:14+5:302022-08-19T17:13:57+5:30
आई, वडील यांनी केली महाराष्ट्र राज्य शासनाकडे लेखी पत्राद्वारे मागणी
- अविनाश कदम
आष्टी (बीड) : तालुक्यातील मांडवा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळेने बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ३ हजार मीटर स्ट्रिपलचेस शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमासह रोप्यपदक ( सिल्वर पदक) पदकाची कमाई करून देशाचा गौरव वाढवला आहे. दरम्यान, इतर राज्याप्रमाणे अविनाशला देखील आर्थिक मदत देण्याची मागणी त्याच्या आईवडिलांनी राज्यशासनाकडे एका निवेदनामार्फत केली आहे.
अविनाश साबळेने कठीण परिस्थितीवर मात करत अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमक दाखवत त्याने अनेक विक्रम देखील आपल्या नावे केली आहेत. नुकतेच त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आहे. बीड जिल्हाधिकारी बिनोद शर्मा यांनी गुरुवारी मांडवा गावी जाऊन अविनाशच्या आईवडिलांचा सत्कार केला. दरम्यान, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, अशी मागणी अविनाशच्या आई-वडिलांनी राज्य शासनाकडे केली आहे.
या मागणीचे निवेदन वडिल मुकुंद साबळे, आई वैशाली साबळे, भाऊ योगेश साबळे यांनी तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्याकडे दिले आहे. मांडवा ग्रामस्थांनी देखील इतर राज्यांप्रमाणे अविनाशला भरघोस आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांमध्ये प्रोत्साहनपर प्रथम क्रमांक तीन करोड रुपये, द्वितीय क्रमांक दोन करोड आणि तृतीय क्रमांक एक करोड अशी आर्थिक मदत दिली जात असल्याची माहिती आहे.
मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र पाठविण्यात आले आहे. - विनोद गुंडमवार, तहसीलदार, आष्टी
तात्काळ दखल घेऊन राज्य शासनाकडे मदतीच्या मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. - राधा बिनोद शर्मा, जिल्हाधिकारी बीड