३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 10:17 PM2024-11-01T22:17:17+5:302024-11-01T22:17:29+5:30

निरक्षर बाबुराव केदार २५ कंटेनरचे मालक...!

Community Lakshmi Pujan of 300 containers; Youth of Sangvi own 450 containers | ३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी

३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी

केज (जि.बीड) : उसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून लागलेला कलंक पुसण्याचा विडा अहमदपूर - अहमदनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सांगवी (सारणी) येथील सुशिक्षित बेकार तरुणांनी उचलला आहे. या गावातील तरुणांकडे आज तब्बल ४५० कंटेनरची मालकी आहे. यापैकी ३०० कंटेनरचे शुक्रवारी रात्री आठ वाजता हभप अर्जुन महाराज लाड यांच्या हस्ते दिवाळीनिमित्त सामूदायिक लक्ष्मीपूजन करण्यात आले.

सांगवी व मस्साजोग येथील शिवेवरील खुल्या जमिनीवर एकाचवेळी ३०० कंटेनरच्या लक्ष्मीपूजनप्रसंगी हभप अर्जुन महाराज, माजी आमदार पृथ्वीराज साठे, महावीर सोनवणे, सरपंच संजय केदार दत्ता धस, रमाकांत धस, चंद्रकांत केदार, वसंत केदार, सुभाष बिक्कड आदी उपस्थित होते. दोन ते अडीच हजार लोकसंख्येच्या गावात बेरोजगार युवकांनी मालवाहतूक ट्रकच्या माध्यमातून उद्योगाचा नवा पर्याय निवडला. आज या छोट्याशा खेडे गावात २५ ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहेत.

याद्वारे भारताच्या कानाकोपऱ्यात ट्रक मालवाहतुकीचे काम करतात. दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने गावातील सर्व कंटेनर चालक, मालकांनी गावात एकत्रित लक्ष्मीपूजन करून अनोखा संदेश दिला आहे. गावात आजमितीस एक-दोन नव्हे तर तब्बल ४५० कंटेनर आहेत. ज्यातून या तरुणांनी महिन्याला कोट्यावधीचे उत्पन्न मिळवून त्यांनी स्वतःची समृद्धी साधली आहे. या गावातील तरुणांच्या संघशक्तीचा आदर्श वाखाणण्याजोगा आहे.

निरक्षर बाबुराव केदार २५ कंटेनरचे मालक...!
दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा बाबुराव केदार याने दुसऱ्याच्या गाडीवर चालकाचे काम केले. नंतर स्वतः एक गाडी घेतली. आज बाबुराव यांच्याकडे तब्बल २५ कंटेनर आहेत. यातून दर महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे सांगताना बाबुराव केदार यांच्या डोळ्यात परिस्थिती बदलल्याचा आनंद दिसत होता. यावेळी भूतकाळातील परिस्थिती आठवल्याने त्यांना अश्रूही अनावर झाले होते. विशेषत: बाबुराव केदार हे निरक्षर आहेत.

२०१५ साली पहिला कंटेनर, आज ४५०
रामेश्वर केदार हे २०१५ साली सांगवीतील पहिले कंटेनर मालक झाले. त्यानंतर गावात कंटेनर घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. आज सांगवीतील ऊसतोड मजुरांच्या मुलांकडे एकूण ४५० कंटेनरची मालकी असल्याची माहिती सरपंच संजय केदार यांनी दिली.

१५० कंटेनरचे सोयीनुसार लक्ष्मीपूजन..
सांगवी गावात एकूण ४५० कंटेनर असून त्यापैकी ३०० कंटेनरची शुक्रवारी गावातील शेतात सामूदायिकपणे लक्ष्मीपूजन करण्यात आले. तर १५० कंटेनरचे लक्ष्मी पूजन आपापल्या सोईनुसार करण्यात आल्याची माहिती जेष्ठ नेते दत्ता धस यांनी लोकमतला दिली.

२५उद्योजकांचा सत्कार..
यावेळी संत भगवानबाबा सोशल फाउंडेशन व सांगवी ग्राम पंचायतीच्या वतीने यशस्वी २५ उद्योजकांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

Web Title: Community Lakshmi Pujan of 300 containers; Youth of Sangvi own 450 containers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.