तेल आणि दुध पावडरपासून बनवायचे खवा; केजमध्ये ३ हजार किलो बनावट खवा जप्त, कंपनी सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 07:15 PM2021-11-25T19:15:22+5:302021-11-25T19:24:30+5:30
दुध पावडर आणि तेलापासून बनावट खवा तयार केला जात असल्याचे झाले उघड
केज ( बीड) : केज-बीड रस्त्यावर उघडपणे सुरू असलेल्या बनावट खवा बनविणाऱ्या कंपनीवर सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी पोलिसांनी सव्वा पाच लाख रुपयांचा जवळपास ३ हजार किलो बनावट खवा ताब्यात घेतला.
या बाबतची माहिती अशी की, केज येथे केज-बीड रोड वरील डॉ पद्मसिंह विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या समोर धनंजय महादेव चौरे (रा. जिवाचीवाडी ता. केज जि. बीड) यांच्या मालकीची व्हर्टिकली फूड्स राधा-कृष्ण नावाची कंपनी आहे. येथे वनस्पती तेल व दुधाच्या पावडरपासून बनावट खवा तयार करीत असल्याची गुप्त माहिती खबऱ्यामार्फत सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. यावरून कुमावत यांनी पोलीस पथक आणि अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह बुधवारी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास कंपनीत छापा मारला. यावेळी दुधाचे पावडर व तेल यापासून बनावट खवा तयार करून विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ५ लाख ३७ हजार ४८० रु. किंमतीचा २ हजार ९५८ किलो ग्रॅम बनावट खवा ताब्यात घेतला. बनावट खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून पुढील आदेश येईपर्यंत कंपनीला सील ठोकले.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अन्न सुरक्षा पथकाचे सय्यद इम्रान हाश्मी, तम्नवार, मुकतार व पोलीस उपनिरीक्षक मारुती माने, पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक रामहरी भंडाने, राजू वंजारे, सचिन अहंकारे, संतोष राठोड, शेंडगे, महिला पोलीस जमादार पाचपिंडे यांच्या पथकाने केली.