विमा कपंनी, कृषी विभागाकडे पीक नुकसानीच्या तक्रारी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:37 AM2021-09-27T04:37:32+5:302021-09-27T04:37:32+5:30
बीड : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळविण्यासाठी ...
बीड : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे, तसेच कृषी विभागात तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. दरम्यान, पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरला आहे त्यांना विमा कंपनीकडून सरसकट नुकसानभरपाई द्यावी, तसेच शासनानेदेखील नुकसानभरपाई हेक्टरी ५० हजार रुपयांप्रमाणे देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
जिल्ह्यात महिन्याच्या सुरुवातीलाच अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर पुन्हा अतिवृष्टी सुरू झाली असून, २७ व २८ सप्टेंबरला मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बळिराजा हवालदिल झाला असून, १०० टक्के सर्वच पिकांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेत सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.
पंचनाम्याचे नाटक बंद करा
सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला फटका बसला आहे, तर काही ठिकाणी पिकांसह शेतजमीन वाहून गेली आहे. त्यामुळे शासनाने पंचनाम्याचे नाटक बंद करून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.
कृषी विभागाचे आवाहन
पीक विमाधारक शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची तक्रार करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central हे ॲप डाऊनलोड करावे अन्यथा ई-मेल - pikvima@aicofindia.com तसेच
कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००-४१९-५००४ नोंदवावी असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी केले आहे.
260921\26_2_bed_23_26092021_14.jpg
पालसिंगण येथील सोयाबीन पिकात साचलेले पाणी