तक्रारदार म्हणतो तक्रारच दिली नाही, मग गुन्हा कसा नोंद केला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:40 AM2021-09-14T04:40:11+5:302021-09-14T04:40:11+5:30
बीड : हाॅटेलमध्ये चहा पिताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन शिवीगाळ करुन धमकावल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद झाला. मात्र, ज्याच्या नावाने ...
बीड : हाॅटेलमध्ये चहा पिताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन शिवीगाळ करुन धमकावल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद झाला. मात्र, ज्याच्या नावाने तक्रार नोंदविण्यात आली, त्याने दहा दिवसानंतर शपथपत्र देऊन आपण तक्रारच दिली नाही, असा दावा केला आहे. मग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद कसा झाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी संदिपान बडगेंविरोधात ३ सप्टेंबर रोजी नितीन रुपचंद गायकवाड (रा. नवगण राजुरी) यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला. मात्र, तक्रारीत नमूद केलेल्या २ सप्टेंबर रोजी आपण बीडमध्ये नव्हे तर पुण्यात होतो, असा दावा नितीन गायकवाड यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ९ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षकांच्या नावे शपथपत्र लिहून देत आपण संदिपान बडगेंना ओळखत नाही व पूर्वी कसला वादही झालेला नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, पंचायत समितीचे उपसभापती मकरंद उबाळे, स्वप्नील गलधर आदींनी पोलीस अधीक्षक आर. राजा यांची भेट घेऊन याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
....
तक्रारदाराने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिलेली आहे. मात्र, त्याने आता माझी तक्रारच नाही, असा दावा केला असेल तर चौकशी करु. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्य समोर येईल.
- साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर ठाणे.
...
बनसोडेंवर निशाणा
शिवाजीनगर ठाण्यातील पोलीस नाईक जालिंदर बनसोडे यांच्या तक्रारीवरुन संदिपान बडगेंवर मार्च महिन्यात गुन्हा नोंद झालेला आहे. बडगेंना ओळखत नाही, असे शपथपत्रात सांगणाऱ्या नितीन गायकवाड यांनी आपली खोटी स्वाक्षरी करुन बनसोडे यांनी खोटा गुन्हा नोंद केल्याचा दावा केला आहे. नितीन गायकवाड यांच्या शपथपत्रातील रोख पोलीस नाईक बनसोडेंकडे कसा, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.
....