बोगस अपंग प्रमाणपत्राची तक्रार; ६ डॉक्टरांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:56 AM2019-02-21T00:56:29+5:302019-02-21T00:57:14+5:30
जिल्हा रुग्णालयातून बोगस प्रमाणपत्र दिले जात असल्याची तक्रार उपसंचालकांना प्राप्त झाली होती. याची दखल घेत बुधवारी सकाळीच समिती बीडमध्ये धडकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील जिल्हा रुग्णालयातून बोगस प्रमाणपत्र दिले जात असल्याची तक्रार उपसंचालकांना प्राप्त झाली होती. याची दखल घेत बुधवारी सकाळीच समिती बीडमध्ये धडकली. संबंधित सहा डॉक्टर व काही रुग्णांचे जबाब घेतले आहेत. यामुळे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.
जिल्हा रुग्णालयातील अपंग विभागाबद्दल मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. दिव्यांग व्यक्तींना अपमानास्पद वागणूक देण्याबरोबरच त्यांना वेळेवर प्रमाणपत्र दिले जात नसल्याचे समोर आले होते. अनेक डॉक्टरांनी पैशासाठी टक्केवारी कमी दिल्याचेही सांगितले जात होते.
हाच धागा पकडून धारूर व माजलगाव येथील नागरिकांनी पुराव्यांसह आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडे लेखी तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेत बुधवारी उपसंचालकांनी एक समिती तात्काळ बीडला पाठविली. तक्रारीत नावे असलेल्या डॉ. एम.एम.जायभाये, डॉ. एम.जी.घडसिंग, डॉ.पी.एस.देशमुख, डॉ.एन.एस.चव्हाण, डॉ.एस.ए.पाटील व डॉ. ए.एन.बोल्डे यांची चौकशी करण्यात आली. यातील काही डॉक्टर चौकशीला उपस्थित राहिले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, यातील दोषींवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदारांनी केलेली आहे.