कंत्राटी कर्मचाऱ्यांची पालकमंत्र्यांपुढे कैफियत - फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:29 AM2020-12-24T04:29:00+5:302020-12-24T04:29:00+5:30
बीड : कोरोनासारख्या लढ्यात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन कैफियत ...
बीड : कोरोनासारख्या लढ्यात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी त्यांनी सेवेत कायम करून घ्यावे अथवा अंशकालीन घोषित करून ५० टक्के जागा आरक्षित ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्याची मागणी केली.
जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान कोरोनाचे रुग्ण वाढले होते. त्यामुळे कोविड केअर सेंटर व रुग्णालयांची संख्या वाढविण्यात आली होती. येथे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने कंत्राटी पद्धतीवर परिचारिका, कक्षसेवक, लिपिक, ऑपरेटर, डॉक्टर यांची पदे भरण्यात आली होती. त्यांना तीन महिन्यांसाठी आदेश दिले होते. आता त्यांचा कालावधी संपला असून ते बेरोजगार झाले आहेत. अगोदरच कोरोनाची परिस्थिती, त्यातही रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हाच धागा पकडून या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत अगोदर जिल्हाधिकारी आणि आता मंगळवारी पालकमंत्री मुंडे यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. यापुढे आरोग्य विभागात भरती निघाल्यास या कर्मचाऱ्यांसाठी ५० टक्के कोटा राखीव ठेवावा, तसेच त्यांना सेवेत कायम करून घेण्याची मागणी केली. यावेळी संभाजी सुर्वे, पवन डावकर, पाराजी कानतोडे, आकाश बागलाने, मुनावर मोमीन, नवनाथ हातवटे, विजयमाला तोंडे, अनिता मुंडे, सविता वनवे आदी कर्मचारी उपस्थित होते.