तुरीचे बियाणे उगवले नसल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:18+5:302021-07-01T04:23:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडा : आष्टी तालुक्यातील कडा परिसरातील निमगाव चोभा, टाकळी, फत्तेवडगाव येथील शेतकऱ्यांनी तुरीचे बियाणे पेरले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : आष्टी तालुक्यातील कडा परिसरातील निमगाव चोभा, टाकळी, फत्तेवडगाव येथील शेतकऱ्यांनी तुरीचे बियाणे पेरले होते. या बियाणांची उगवण न झाल्याने कृषी विभागाने तातडीने पाहणी करावी. तसेच त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी मंगळवारी एका निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्याकडे केली आहे.
यावर्षी कोरोनामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून यंदा पाऊस चांगला पडत असल्याने शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी-बियाणे खरेदी करून खरिपाची पेरणी केली. आष्टी तालुक्यातील कडा येथील एका कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेले तुरीचे बियाणे उगवलेच नाही. बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांच्या न उगवलेल्या पिकांची त्वरित पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी अण्णासाहेब गाडे, जगन्नाथ काळे, गोरख पंढरीनाथ खोटे, ज्ञानेश्वर खोटे यांनी कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्याकडे केली आहे.
...
दुकानदारांनी झटकले हात
कृषी दुकानदाराने दखल घेतली नाही.
शेतकऱ्यांनी कृषी दुकानदारांकडे बियाणे उगवले नसल्याची तक्रार केली असता त्यांनी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. उलट तुम्ही बियाणे कंपनी विरोधात तक्रार करा असे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी अण्णासाहेब गाडे यांनी केली आहे.
...
शेतकऱ्यांनी पेरलेल्या लॉटमधील बियाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.