मराठीचा पेपर फोडणाऱ्या ‘त्या’ शिक्षकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:16 AM2019-03-03T00:16:15+5:302019-03-03T00:17:24+5:30
दहावीची परीक्षा सुरु असतानाच अवघ्या दिड तासात व्हॉट्सअॅपवर मराठीचा पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
अंबाजोगाई / धारुर : दहावीची परीक्षा सुरु असतानाच अवघ्या दिड तासात व्हॉट्सअॅपवर मराठीचा पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
पांडुरंग गणपत मेकुंडे (रा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. मेकुंडे भावठाणा येथील साने गुरूजी विद्यालयात सहशिक्षक आहे. शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर होता. या परीक्षेसाठी मेकुंडे आडस येथील केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नियुक्त होता. परीक्षा सुरु झाल्यापासून अवघ्या दीड तासात मेकुंडे याने मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फोडून ती ‘जिजामाता अंबाजोगाई टीचर्स’ या शिक्षकांच्या ग्रुपवर टाकली. ग्रुपवर प्रश्नपत्रिका पाहताच अनेक सजग शिक्षकांनी याचा निषेध करत त्या शिक्षकाला खडसावले. विशेष म्हणजे अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे देखील या ग्रुपचे सदस्य आहेत. ओरड होऊ लागल्यानंतर त्यांनी या प्रकाराबाबत वरिष्ठांना कळविले. बोर्डालाही हा प्रकार कळवण्यात आला होता.
शनिवारी रात्री उशीरा या प्रकरणात अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या फिर्यादीवरुन पांडुरंग मेकुंडे विरोधात धारुर पोलिस ठाण्यात कलम ५, (१) (२) ६ महाराष्ट्र विद्यापीठ/बोर्ड व इतर विनिर्दिष्ट परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध करण्याचा कायदा १९८२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तत्पूर्वी दुपारपासून शिक्षण विभागाचे अधिकारी धारुर ठाण्यात तक्रार देण्यासाठी बसून होते.
संस्थेने दिला २४ तासांचा अल्टीमेटम
मेकुंडे याच्या निलंबनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर संस्थाचालकांनी तातडीची बैठक बोलावली. बैठकीत ठरल्यानुसार मेकुंडे याला आपले म्हणणे मांडण्यासाठी २४ तासांचा अवधी देण्यात आला आहे. त्यांनतर रविवारी सायंकाळी बैठक होऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
मेकुंडे सरपंच पती
गुन्हा नोंद करण्यात आलेल्या शिक्षकाची पत्नी ही अंबाजोगाई शहराजवळ असलेल्या मोरेवाडी गावची सरपंच आहे. मेकुंडेने आपल्या एका नातेवाईकासाठी हा पेपर फोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.