शिरूर येथे संगणक प्रशिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 12:11 PM2020-01-06T12:11:59+5:302020-01-06T12:19:45+5:30
याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून महेश नागरे याला अटक करण्यात आली आहे.
शिरूर कासार (जि. बीड) : गुरू शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना शिरूर कासार येथील कौशल्य संगणक प्रशिक्षण संस्थेत घडली आहे. महेश नवनाथ नागरे या शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार करून शिक्षणक्षेत्राला कलंकित केले आहे. याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून महेश नागरे याला अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील हनुमानवाडी येथे २८ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आली आहे. तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब येथील राहणारा महेश नवनाथ नागरे याने शिरूर कासार येथील बसस्थानकासमोर कौशल्य कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट नावाने संगणक प्रशिक्षण संस्था सुरु केली. येथे शिक्षक म्हणून तोच शिकवितो. त्याच्या या प्रशिक्षण केंद्रात एक २१ वर्षीय तरूणी संगणक शिक्षणासाठी येत होती. १३ डिसेंबर रोजी साडेअकरा वाजता शिकवणी संपल्यानंतर काही काम असल्याचे सांगून सदर तरूणीला महेश नागरे याने आपल्या प्रशिक्षण केंद्रातच थांबवून ठेवले. सर्व विद्यार्थी निघून गेल्यानंतर केंद्राचा दरवाजा बंद करुन अत्याचार केला. ही घटना इतरांना सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षकाविरूद्ध ४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरूरे यांच्याकडे तपास असून जलद गतीने तपास करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले जाईल असे त्यांनी सांगितले.
आरोपी विवाहित
बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेला संगणक शिक्षक महेश नागरे हा विवाहित आहे. त्यास दोन अपत्ये आहेत. तर पीडित तरूणी अविवाहित आहे. या प्रकाराने शैक्षणिकक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
तीन दिवसांची पोलीस कोठडी
आरोपी महेश नागरे याला गुन्हा दाखल झाल्याबरोबर अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला ५ जानेवारीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.