कृषिपंपाच्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:33 AM2021-03-10T04:33:10+5:302021-03-10T04:33:10+5:30
अविनाश कदम आष्टी : नवीन कृषिपंप वीज धोरण २०२० अंतर्गत कृषी वीज देयक थकबाकीदारांना वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून आकर्षक सवलत ...
अविनाश कदम
आष्टी : नवीन कृषिपंप वीज धोरण २०२० अंतर्गत कृषी वीज देयक थकबाकीदारांना वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून आकर्षक सवलत देण्यात येत असून, आष्टी तालुक्यातील १९ हजार ७६३ शेतकऱ्यांकडे २४४ कोटी थकबाकी असून, यापैकी शेतकऱ्यांना फक्त ८३ कोटी रक्कम भरावी लागणार आहे. यामध्ये ७० टक्के सवलत शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन सवलत मिळवावी, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता प्रवीण पवार यांनी केले आहे. याबाबत महाकृषी अभियान कृषी ऊर्जा पर्व या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले.
१ जानेवारीपासून ६९ शेतकऱ्यांनी सहा लाख ९५ रुपयांची थकबाकी भरून या सवलतीचा लाभ घेतला आहे. याबाबत महावितरणकडून महाकृषी अभियान कृषी ऊर्जा पर्व १४ एप्रिलपर्यंत राबविण्यात येत असून, यामध्ये सायकल रॅली, ग्रामसभा, सार्वजनिक ठिकाणी तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती विविध कार्यालये आदी ठिकाणी पोस्टर बॅनर, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कीर्तनकार, समाजप्रबोधनकार, वासुदेव, प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत वीजबिल भरून ७० टक्के माफी मिळवावी, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता प्रवीण पवार यांनी केले आहे.
विलंब शुल्क माफ
तालुक्यातील जे २०१५ पूर्वीचे कृषिपंपाचे थकबाकीदार शेतकरी आहेत, त्यांचे विलंब शुल्क आणि व्याज पूर्णतः माफ करण्यात येणार असून, केवळ रक्कम वसूल करण्यात येणार आहे. हा विलंब शुल्क माफ करताना व्याजदर सध्याच्या १८ ऐवजी ९ ते १० टक्के आकारण्यात येणार आहे. अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने वसूल करण्यात येणार आहे.
७० टक्के सवलत
सप्टेंबर २०१५ ते २०२० पर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांना विलंब आकार १०० टक्के माफ व व्याजही सरासरी ९ ते १० टक्के असून, तालुक्यातील १९ हजार ७६३ शेतकऱ्यांकडे २४४ कोटी रक्कम थकीत असून, त्यांनी ३१ मार्चपर्यंत भरल्यास फक्त ८३ कोटी रक्कम भरावी लागणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ७० टक्के सवलत मिळणार आहे.