पेरणीसह शेतकऱ्यांवर शंखी गोगलगायीचे संकट; उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
By शिरीष शिंदे | Published: July 8, 2023 12:59 PM2023-07-08T12:59:46+5:302023-07-08T13:00:08+5:30
जमिनीची खोल नागरंट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावेत, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरुन गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते.
बीड: समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यात आता भर म्हणून की काय, शंखी गोगलगायीने पुन्हा डोकेवर काढले आहे. शंखी गोगलगायींना वेळीच रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात अद्यापपर्यंत पेरण्या पुर्णपणे झाल्या नाहीत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ४ जुलै पर्यंत केवळ १८.३९ टक्केच खरीप हंगामात पेरण्या झाल्या आहेत. १०० मीमी पाऊस झाल्या शिवाय पेरणी करु नये असे आवाहन कृषी विभागाने यापुर्वी केले असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अशी गंभीर स्थिती असताना शेतकऱ्यांवर शंखी गोगलगायीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव वेळीच रोखणे आवश्यक आहे.
शंखी गोगलगाय किडीचे ओळख
शंखीच्या पाठीवर एक ते दीड इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांशी शंखी गर्द, करड्या, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. हि किड रात्रीच्या वेळेस आक्रमक होऊन पाने खाऊन छिद्र पाडते. तसेच नवीन रोपे, कोंब, भाजीपाला वर्गीय पिके, फळे तसेच इतर सर्व प्रकारच्या पिकांचे अवशेष यावरही उपजिविका करते.
काय कराव्यात प्रतिबंधात्मक उपाय योजना
जमिनीची खोल नागरंट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावेत, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरुन गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते. रबरी हातमोजे घालून प्रादुर्भावीत शेतातील शंखी गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करुन नष्ट करावीत. १ किलो गुळ १० लिटर पाण्यात टाकुन गुळाचे द्रवण करावे, त्यामध्ये गोणपाटाची पोती भिजवून ती संध्याकाळच्या वेळी शेतात, पिकाच्या ओळीत पसरवून ठेवावीत. त्या खाली लपलेल्या गोगलगायी सकाळी गोळा करुन उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या द्रवणात किंवा केरोसीन मिश्रीत पाण्यात टाकन माराव्यात किंवा खोल खड्ड्यात पुरुन वरुन चुन्याची भुकटी टाकून खड्डा मातीने झाकावा. लहान गोगलगायीच्या नियंत्रणासाठी २० टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी, शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आतल्या बाजूने तंबाखू किंवा चुन्याचा ४ ते ५ इंच टाकल्यास गोगलगायींना अटकाव होतो.
रासायनीक उपाय योजना
मेटाल्डिहाईडचा २.५ टक्के भुकटीचा वापर गोगलगायींच्या मार्गात किंवा पिकांच्या दोन ओळीत किंवा प्रादुर्भाव क्षेत्रात केल्यास गोगलगायींचे चांगले नियंत्रण करता येते. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी विषारी अमिषाचा वापर करता येतो. विषारी आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी हातांमध्ये रबरी मोजे घालून गोळा करुन १ मीटर खोल खड्ड्यात पुरुन टाकाव्यात. मिथोमिल हे अत्यंत विषारी किटकनाशक असल्याने पाळीव प्राणी तसेच भटके प्राणी किंवा पक्षी अमिषाने मेलेल्या गोगलगायी खाणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावे असे सांगण्यात आले आहे.
सामुहिकरित्या प्रयत्न करणे आवश्यक
शंखी गोगलगायी नियंत्रणासाठी केवळ एकट्या शेतकऱ्याने प्रयत्न न करता सामुहिकरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच कृषी विद्यापीठाच्या शिफारशी प्रमाणे उपचाराचा अवलंब करावा. केवळ एकच पर्याय वापरुन चालत नाही. उदा. केवळ चुन्याची पट्टी टाकून चालत नाही तर त्यासोबत दुसरा पर्यायही जोडावा लागतो.
-बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड