तोतया परिक्षार्थी बसवणाऱ्यास सशर्त जामीन, राेज पोलीस ठाण्यात लावावी लागणार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 02:00 PM2022-02-10T14:00:44+5:302022-02-10T14:02:25+5:30
म्हाडा परीक्षेत तोतया परीक्षार्थ्यास झाली होती अटक
बीड : म्हाडाच्या अभियांत्रिकी परीक्षेत तोतया परीक्षार्थ्यास १ फेब्रुवारी रोजी पकडले होते. मूळ परीक्षार्थी राहुल किसन सानप (रा.वडझरी ता.पाटोदा) यास येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अटी, शर्थीनुसार त्यास १३ फेब्रुवारीपर्यंत शिवाजीनगर ठाण्यात रोज हजेरी लावावी लागणार आहे.
अर्जुन बाबूलाल बिघोत (वय २८, रा. जवखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) हा १ फेब्रुवारी रोजी राहुल सानप याच्या जागी म्हाडाच्या अभियांत्रिकी पदाची परीक्षा देण्यासाठी बीडला आला होता. परीक्षार्थींना केंद्रात प्रवेश देताना त्याचे वर्तन संशयास्पद आढळले. त्यानंतर त्यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले होते. त्याच्याकडे डिव्हाइस, मोबाइल व मायक्रो यंत्र आढळून आले असून, ते जप्त केले आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या परीक्षेत वडझरी कनेक्शन समोर आल्यामुळे खळबळ उडाली होती. राहुल हा वडझरीचा रहिवासी असल्याने आरोग्य व टीईटी परीक्षेतील पेपरफुटीत अर्जुन बिघोतचा सहभाग आहे का, याची पडताळणी पुण्याच्या सायबर सेलच्या पथकाने बीडमध्ये येऊन केली आहे. ५ रोजी अर्जुन बिघोतची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. राहुल सानपने येथील सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. त्यास ८ फेब्रुवारीस अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून ९ रोजी सकाळी त्याने शिवाजीनगर ठाण्यात धाव घेतली. उपनिरीक्षक शैलेश शेजुळ व पो.ना. मोहसीन शेख यांनी त्याची चौकशी केली.
चौकशीनंतर होईल खुलासा
बनावट परीक्षार्थी अर्जुन बिघोतने चौकशीत सहकार्य केले नाही, त्यामुळे या रॅकेटमध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे, हे समोर आले नाही. मात्र, आता राहुल सानप १३ फेब्रुवारीपर्यंत रोज ठाण्यात हजेरी लावणार आहे. यावेळी त्याची सखोल चौकशी केली जाईल. चौकशी झाल्यानंतरच त्यास दररोज सोडण्यात येईल. यानंतर याप्रकरणात सर्व खुलासे होतील, असे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी सांगितले.