पीपीई कीटमधील संघर्ष; पाण्याविना घसा पडतोय कोरडा; घामाने अंग ओलेचिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 06:23 PM2020-10-27T18:23:36+5:302020-10-27T18:25:25+5:30
कर्तव्याच्या वेळेत तहान लागली तरी संसर्ग होण्याच्या भितीपोटी पाणीही पिता येत नाही.
- सोमनाथ खताळ
बीड : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी पीपीई कीटचा वापर करतात. एकदा घातलेली कीट ड्यूटी संपल्यावरच काढली जाते. तोपर्यंत पाण्याविना घसा कोरडा पडतो. तर घामाने अंग ओले चिंब होते. अशा परिस्थितीत काम करताना त्यांना कसरत करावी लागत आहे. परंतु त्यांनी अद्यापही यातून माघार न घेता कोरोनाविरोधात लढा देत आहेत.
सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १३ हजारांच्या जवळपास पोहचली आहे. जिल्ह्यात खाजगी व शासकीय असे ३० कोवीड केंद्र आहेत. येथे लक्षणे असलेले व नसलेल्या बाधितांवर उपचार केले जातात. यासाठी जवळपास १५० डॉक्टर व ८०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. हे सर्वजण जीव धोक्यात घालून प्रामाणिक कर्तव्य बजावत आहेत. कोवीड रुग्णालयात उपचार करण्यासाठी जाताच सर्वजण पीपीई कीट परीधान करतात. मास्क, कीट, फेस शिल्ड, बुट असे साहित्य त्यात असते. ही कीट घालताच अवघ्या अर्धा ते एका तासात अंग घामाघुम होते. कर्तव्याच्या वेळेत तहान लागली तरी संसर्ग होण्याच्या भितीपोटी पाणीही पिता येत नाही. त्यामुळे घसा कोरडा पडतो. कर्तव्य पूर्ण करून बाहेर पडताच सर्वजण मोकळा श्वास घेतात. त्यानंतर अंघोळ करून कपडे, सोबतच्या वस्तू स्वच्छ करूनच क्वारंटाईन खोली, वसतिगृहात प्रवेश करीत असल्याचे सांगण्यात आले.
पीपीई कीट वापरल्याने श्वसनास त्रास
बाधित रुग्णावंर उपचार करताना नाक, तोंडाला दोन ते तीन मास्क लावले जातात तसेच वरून फेस शिल्ड असते. यातून श्वास घेणे कसरतीचे ठरते. तसेच ज्यांना दमा आहे अथवा इतर आजार आहेत, त्यांना सार्वाधिक त्रास सहन करावा लागतो. डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक यांच्याबरोबरच स्वॅब घेणारे तंत्रज्ञ व इतर संबंधित कर्मचारी हे सुद्धा पीपीई कीटमध्ये कर्तव्य बजावतात. त्यांनाही धावपळ करावी लागते.हातात ग्लोज असतात. सलाईन, अथवा इंजेक्शन दिल्यानंतर पट्टी लावताना त्रास होतो. ही पट्टी हाताला चिटकते. त्यामुळे व्यवस्थित बसत नाही. यात रुग्णाला त्रास होतो.
कुटूंबाला व्हिडीओ कॉलने संवाद
कोरोनासाठी कर्तव्य बजावत असताना डॉक्टर, कर्मचारी कुटूंबापासून दूर असतात. तेव्हा ते कूटूंबाशी व्हिडीओ काॅल करून संवाद साधतात. अनेकांची मुले लहान असतात. त्यांना पाहून हे कर्मचारी अनेकदा भावनिक होतात.
रोटेशननुसार कर्तव्य
जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक यांचे पाच दिवसांचे रोटेशन आहे. त्यानंतर त्यांना दोन दिवस सुट्टी देऊन पुन्हा पहिल्ल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर व्हावे लागते. तर कोवीड केअर सेंटर व रुग्णालयात नियूक्त केलेला स्वतंत्र स्टाफ हा कोवीडमध्येच कायम कर्तव्य बजावतो. काही लोक वसतिगृहात राहतात तर काही घरी जावून स्वतंत्र खोलीत क्वारंटाईन होत असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
काळजीबाबत प्रशिक्षण दिले आहे
पीपीई कीट घातल्यावर मास्कमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच कीटमुळे अंग घामाघुम होते. त्रास होत असला तरी डॉक्टर,कर्मचारी रुग्णांवर उपचार करीत आहेत्र. त्यांचा कायम अभिमान राहील. कीट घातल्यानंतर घ्यावयाची काळजीबाबत प्रशिक्षण दिले आहे.
- डॉ.आर.बी.पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड