वीज बिलांबाबत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:03+5:302020-12-31T04:32:03+5:30
हातगाडे रस्त्यावर अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात शिवाजी चौक, सावरकर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यांवर ...
हातगाडे रस्त्यावर
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात शिवाजी चौक, सावरकर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यांवर सातत्याने हातगाडे रस्त्यावर लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाने हे हातगाडे रस्त्याच्या बाजूला न लावता पाठीमागे सरकून लावण्यासाठी कारवाई करावी व रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
भाजीपाल्याच्या दरात घसरण
अंबाजोगाई -: ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या दरांमध्ये अचानकच घसरण झाली आहे. टमाटे, बटाटे, पत्ताकोबी, फुलकोबी, सिमला मिरची, हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दरही कमी झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
वीटभट्ट्यांमुळे पर्यावरण धोक्यात
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात व परिसरात मुख्य रस्त्यालगत अनेक वीटभट्ट्या थाटण्यात आल्या आहेत. यातील अनेक वीटभट्ट्यांना रीतसर परवानगी नसतानाही अशा भट्ट्या सुरू आहेत. पर्यावरणाला मोठा धोका निर्माण करणाऱ्या या वीटभट्ट्या शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करत आहेत. प्रदूषण निर्माण करणाऱ्या या वीटभट्ट्यांवर महसूल प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
कार्यालयाच्या भिंती रंगलेल्याच
अंबाजोगाई : शासकीय कार्यालयाच्या भिंतीवर ‘येथे थुंकू नये’ अशी सूचना लिहिलेली असते; परंतु त्याच शासकीय कार्यालयांतील कर्मचारी व कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांकडून त्याचे सातत्याने उल्लंघन होते. परिणामी शासकीय कार्यालयाच्या भिंती रंगलेल्याच दिसतात. यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
यंदा कडब्याला जनावरे दुरावणार
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात उसाची लागवड व हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. ज्वारीचे पीक लावल्यानंतर ज्वारी सांभाळणे मोठ्या जिकिरीचे काम आहे. तसेच ज्वारीला बाजारात योग्य भावही मिळत नाही. ज्वारीपेक्षा हरभऱ्याचा पेरा आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरतो. त्यामुळे तालुक्यात ज्वारीचा पेरा अत्यल्प झाला आहे. पेरा कमी झाल्यामुळे जनावरांसाठी लागणारा कडबा यात मोठी तूट निर्माण होईल. यामुळे जनावरे ज्वारीच्या पोषक अशा कडब्याला मुकणार आहेत.
मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालक संभ्रमावस्थेत
अंबाजोगाई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याबाबत निर्णय झाला असला तरी आपल्या मुलां-मुलींना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत अद्यापही पालकांमध्ये संभ्रम आहे.