आरोग्य विभागातील बदल्यांत घोळ; एकाच पदावर दोघांना नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:34 AM2021-08-15T04:34:55+5:302021-08-15T04:34:55+5:30

बीड : आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संवर्गातील ४२४ बदल्या झाल्या असून, यात मोठा घोळ असल्याचे समोर आले ...

Confusion in health department transfers; Appointment of both to the same post | आरोग्य विभागातील बदल्यांत घोळ; एकाच पदावर दोघांना नियुक्ती

आरोग्य विभागातील बदल्यांत घोळ; एकाच पदावर दोघांना नियुक्ती

Next

बीड : आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संवर्गातील ४२४ बदल्या झाल्या असून, यात मोठा घोळ असल्याचे समोर आले आहे. लातूरमधील रेणापूर व बीडमधील आष्टीत तालुका आरोग्य अधिकारी या एकाच पदावर दोघांची नियुक्ती केली आहे, तसेच नुकतेच वर्ग-१ मध्ये प्रमोशन झालेल्या सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना डिमोशन करून टीएचओपदी नियुक्ती दिली आहे.

बीडमधील आष्टी येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून लातूरच्या भातागळी आरोग्य केंद्रातील डॉ. सगीर पठाण यांची नियुक्ती केली आहे. वास्तविक पाहता या पदावर १४ जुलै रोजी डॉ. जयश्री शिंदे या रुजू झालेल्या आहेत. विशेष म्हणजे त्या परमनंट आहेत. मग त्यांची जागा भरलेली असतानाही त्याच जागेवर नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे, तसेच लातूरमधील कारेपूर आरोग्य केंद्रातील डॉ. श्रीधर रेड्डी यांची रेणापूर तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे याच पदावर लातूरमधीलच शिरूर अनंतपाळचे टीएचओ डॉ. रामराव पवार यांची नियुक्ती झाली आहे. अगोदरचे पद असतानाही नव्याने नियुक्ती देण्यासह एकाच पदावर एकाच आदेशात दोघांची नियुक्ती झाल्याने आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष किती आहे, याची प्रचीती येते. राज्यात असे प्रकार अनेक ठिकाणी झाल्याची चर्चा आरोग्य विभागात आहे. हे आदेश शासनाचे सहसचिव वि.ल. लहाने यांनी काढले आहेत.

रौफ यांच्याकडे डीएचओचा पदभार

कळमनुरी, जि. हिंगोली येथून पदोन्नतीने डॉ. रौफ शेख बीडला सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर आले. डॉ. आर.बी. पवार यांची बदली झाल्याने त्यांच्याकडे डीएचओपदाचा अतिरिक्त पदभार आहे. आता त्यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या यादीत नाव असून, हिंगोलीत वसमत येथे टीएचओ म्हणून नियुक्ती झाली आहे. प्रमोशन झालेल्या अधिकाऱ्याला डिमोशन दिल्याचा प्रकार यानिमित्ताने उघड झाला आहे.

--

यादी पाहून मलाच धक्का बसला आहे. यात काही चुका झाल्या आहेत. याबाबत वरिष्ठांना विचारणा करत आहे.

-डॉ. रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

Web Title: Confusion in health department transfers; Appointment of both to the same post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.