बीड बायपासवरील उड्डाणपुलांच्या उंचीवरून संभ्रम! एक पूल १५ जानेवारीपर्यंत खुला होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 07:17 PM2022-12-23T19:17:24+5:302022-12-23T19:18:04+5:30

संग्रामनगरसह देवळाई चौकातील उड्डाणपुलाच्या कामावरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

Confusion over the height of the flyover on Beed Bypass! One bridge will be open by January 15 | बीड बायपासवरील उड्डाणपुलांच्या उंचीवरून संभ्रम! एक पूल १५ जानेवारीपर्यंत खुला होणार

बीड बायपासवरील उड्डाणपुलांच्या उंचीवरून संभ्रम! एक पूल १५ जानेवारीपर्यंत खुला होणार

googlenewsNext

औरंगाबाद : बीड बायपासवर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांच्या उंचीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. रस्त्याचे काम सुरू होऊन अडीच वर्षे झाली आहेत. अपघाताचा मार्ग म्हणून त्या रस्त्याची नोंद झाल्यानंतर शासनाने त्या रस्त्याला ३८३ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. तीन पुलांचे काम होत आले असले तरी काम पूर्ण झाल्यावर नेमकी वाहतूक कशी असणार, उड्डाणपुलांची उंची कमी तर नाही ना, यासारखे प्रश्न त्या रस्त्यांवरून जाणाऱ्यांना पडत आहेत. जी-२० परिषदेमुळे संग्रामनगरसमोरील पूल १५ जानेवारीपर्यंत वाहतुकीला खुला करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार सध्या काम सुरू आहे.

कोरोनाच्या दोन लाटा, शासनाकडून निधी न मिळणे, जलवाहिनी स्थलांतरित न करणे यांसह इतर संस्थांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे अडथळे दूर करीत या बायपासचे काम सुरू असले तरी संग्रामनगरसह देवळाई चौकातील उड्डाणपुलाच्या कामावरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. संग्रामनगर पुलाचे लँडिंग आणि नवीन पुलाखालील अंडरपास यांचा उतार प्रतापनगरच्या नाल्याच्या दिशेने वळविण्यात येईल. असे पुलाचे डिझाइन आहे. देवळाई चौकातील पुलाखाली देखील साडेपाच मीटर उंची असेल, असा दावा करण्यात येत आहे. तिन्ही पुलांच्या खाली सव्वा ते पावणेदोन मीटरपर्यंत खोली करून वाहतुकीसाठी रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. हे सगळ्या तांत्रिक आराखड्यानुसार आहे. यात बदल होणार नाही. पुलाखालील अंडरपासचे पाणी प्रतापपगर नाल्यात पाइपने साेडण्यात येणार आहे.

कंत्राटदाराचा दावा असा....
संग्रामनगरसमोरील विद्यमान रस्त्यापासून पुलाखाली २ मीटर खाेदकाम असेल. आरटीएलचे (रोड टॉप लेव्हल) मोजमाप करून ते संग्रामनगर उड्डाणपुलाच्या लँडिंगपर्यंत जुळविण्यात येणार आहे. पुलाखालून होणाऱ्या मार्गावरील पाणी प्रतापनगरच्या नाल्यापर्यंत १२०० मिलीमीटरच्या पाइपने सोडण्यात येणार आहे. देवळाई चौकातही साडेपाच मीटर उंची आरटीएलपासून असणार आहे. सगळे काही डिझाइनप्रमाणे आहे.
- जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.

पीडब्ल्यूडीचा दावा असा...
पुलाखालून वाहने जाण्यासाठी साडेपाच मीटरची उंची असणार आहे. हे स्टॅण्डर्ड प्रमाण आहे. तसे डिझाइन मंजूर केलेले आहे. चुकीचे किंवा तांत्रिक चुका असलेले काम कसे केले जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक एकदम सुरळीतपणे राहील. कुठेही अडचण येणार नाही.
- नरसिंग भंडे, कार्यकारी अभियंता, जागतिक बँक प्रकल्प

ईपीसी हायब्रीड अॅन्युटी मॉडेलनुसार काम
ईपीसी हायब्रीड अॅन्युटी मॉडेलनुसार काम सुरू असून, त्यात चार उड्डाणपुलांसह १७ किमी रस्त्याचा समावेश आहे.

कंत्राटदार कोण आहे...
जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला २९१ कोटी व इतर ९२ कोटींच्या कामांचे कंत्राट २०२० मध्ये मिळाले आहे.

बायपासवर किती पुलांचे काम
एमआयटी, संग्रामनगर, देवळाई चौक आणि केम्ब्रिज शाळेसमोर असे चार उड्डाणपूल या प्रकल्पात समाविष्ट असून, यापैकी तीन पुलांचे काम बायपासवर आहे. व्हीयूपी म्हणजे व्हेईकल अंडरपास व व्हीओपी म्हणजे व्हेईकल ओव्हरपास म्हणजे पुलावरून आणि खालून वाहतुकीसाठी केलेली व्यवस्था तेथे असणार आहे.

Web Title: Confusion over the height of the flyover on Beed Bypass! One bridge will be open by January 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.