परळी विधानसभेवर कॉँग्रेसचाही दावा, जिल्हाध्यक्ष देशमुखांनी दिले धनंजय मुंडेंना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 07:01 PM2024-07-23T19:01:15+5:302024-07-23T19:01:55+5:30
कॉँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख माकेगावकर यांनी शड्डू ठोकत धनंजय मुंडे यांना दिले आव्हान.
परळी : कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची काँग्रेसने देखील इच्छुक आहे. बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख माकेगावकर यांनी शड्डू ठोकत धनंजय मुंडे यांना आव्हान दिले. परळी मतदारसंघास गतवैभव प्राप्त करून शहरात शांतता आणि व्यापारपेठ भरभराटीला आणू, असे सांगून देशमुख यांनी महाविकास आघाडीतून काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणूक लढविस इच्छुक असल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर केले.
परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार ) चे राष्ट्रीय प्रवक्ते धनंजय मुंडे हे आमदार असून महायुती सरकारमध्ये कृषीमंत्री आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून धनंजय मुंडे हेच उमेदवार असतील यात शंका नाही. मात्र, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक आहेत. आज दुपारी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी देखमुख यांनी आपणही परळी मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले. यावेळी पत्रकार परिषदेस काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनीफ आणि ऊर्फ बहादुर , माजी शहराध्यक्ष प्रकाश देशमुख, इतेशाम खतीब, गडेकर, बद्द्रभाई,सिरसाठ,निर्मळ, रणजीत देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडीत जागा कोणाला?
दरम्यान, महाविकास आघाडीत परळी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट )व काँग्रेस कडून अनेक जण इच्छुक आहेत. फुलचंद कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अनेक जण निवडणूक लढविण्याची तयारी करीत असल्याची माहिती आहे. तसेच तसेच रासपाचे युवा माजी प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांनी देखील परळी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. फंड यांनी पक्ष प्रवेश करून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मंत्री मुंडेंसाठी लोकसभेसारखीच विधानसभा निवडणूक आव्हानात्मक
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याने या मतदारसंघातून आता महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे हे उमेदवार असणार आहेत. त्या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी तयारी सुरू केली आहे.यातच आज काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. महा विकास आघाडीत मतदारसंघ कोणाला सुटतो हे अद्याप निश्चित झाले नाही. मात्र, मंत्री मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडूनच निवडणूक लढण्याची अनेक नेत्यांची इच्छा आहे. यामुळे लोकसभेसारखेच विधानसभा देखील मुंडे भाऊ-बहिणींना आव्हानात्मक ठरेल अशी चर्चा आहे.