खतांच्या दरवाढीचा कॉंग्रेसकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:34 AM2021-05-18T04:34:31+5:302021-05-18T04:34:31+5:30
: रासायनिक खतांच्या भरमसाठ दरवाढीच्या निषधार्थ तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने माजी तालुकाध्यक्ष नारायण होके पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध ...
: रासायनिक खतांच्या भरमसाठ दरवाढीच्या निषधार्थ तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने माजी तालुकाध्यक्ष नारायण होके पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. सध्या कोरोना महामारीने देश मोठ्या संकटात असताना देखील शेतकरी मात्र रात्रंदिवस काबाडकष्ट करून सर्वांसाठी धान्य पिकवत आहे.
अशावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणे गरजेचे असताना ऐन खरिपाच्या पेरणी वेळी खतांमध्ये भरमसाठ भाववाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा विडा उचलला आहे काय, असा सवाल यावेळी होके पाटील यांनी केला. किसान सन्मान योजनेच्या नावाखाली दोन हजार रूपये देऊन देशभर दवंडी पिटणारे मोदी सरकार आपल्या उद्योगपती मित्रासाठी त्याच शेतकऱ्यांकडून या रूपात लाखोंची वसुली करत आहे. हा मोदी सरकारचा ढोंगीपणा कॉंग्रेस पक्ष कदापिही सहन करून घेणार नाही.
मोदी सरकारने खतांच्या किमती तत्काळ कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा नसता माजलगाव तालुका कॉंग्रेसच्या तीव्र आंदाेलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबतचे निवेदन तहसीलदार वैशाली पाटील यांना देण्यात आले. यावेळी ॲड. इनामदार, शेख अहेमद, गणेश चोरमले, विनोद सुरवसे आदि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.