धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा; जगमित्र शुगर मिल्स प्रकरणात जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:08 PM2022-04-04T19:08:36+5:302022-04-04T19:09:14+5:30
२०१८ साली मुंजा गित्ते यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
अंबाजोगाई - तालुक्यातील पूस येथील प्रस्तावित साखर कारखान्याच्या प्रकरणात २०१८ साली दाखल गुन्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांना आज सोमवारी (दि.०४) अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) न्या.शिवदत्त पाटील यांनी जामीन मंजूर केला.
२०१८ साली मुंजा गित्ते यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी वारंट निघाल्याने धनंजय मुंडे यांनी न्यायालासमोर स्वतः हजर होत जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी मुंडे यांच्यावतीने ॲड. अशोक कवडे यांनी कामकाज पाहिले.
काय आहे प्रकरण-:
अंबाजोगाईतील तळणी गावात राहणाऱ्या मुंजा गिते यांची जवळपास तीन हेक्टर जमीन जगमित्र साखर कारखान्यासाठी ५० लाखांत खरेदी करण्यात आली होती. व्यवहारात ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याला कारखान्याने अगोदर एक लाख आणि काही दिवसांनी ७ लाख ८१ हजार २५० रुपयांचा चेक दिला गेला. शिवाय या साखर कारखान्यात गिते यांच्या मुलासहीत आणखी चौघांना नोकरी देण्याचीही हमी देण्यात आली होती. गिते यांचा मुलगा, नातू आणि भावाच्या दोन मुलांना प्रतिमाह तीन हजार रुपयांप्रमाणे सहा महिने काम देऊन पगारही देऊ करण्यात आला. मुंडे यांच्यासाठी मुखत्यारपत्र वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांच्या नावावर करण्यात आलं. त्यानंतर मात्र कारखान्याच्या नावे परळी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावानं असलेला ४० लाख रुपयांचा चेक गिते यांना देण्यात आला आला होता.तो चेक न वाटल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.