मतदार संघ एक अन् दावेदार अनेक; बीड जिल्ह्यातून विधानसभेसाठी कोणाला मिळणार उमेदवारी?

By सोमनाथ खताळ | Published: July 29, 2024 12:14 PM2024-07-29T12:14:15+5:302024-07-29T12:14:42+5:30

पक्षश्रेष्ठींपुढे पेच : धनंजय मुंडेंच्या विधानामुळे काही इच्छुकांमध्ये अस्वस्थता

Constituency one and contenders many; Who will get candidature for assembly from Beed district? | मतदार संघ एक अन् दावेदार अनेक; बीड जिल्ह्यातून विधानसभेसाठी कोणाला मिळणार उमेदवारी?

मतदार संघ एक अन् दावेदार अनेक; बीड जिल्ह्यातून विधानसभेसाठी कोणाला मिळणार उमेदवारी?

बीड : आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी एका मतदारसंघातून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे यातून कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे. मागील आठवड्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिथे ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्याच पक्षाची असे विधान केल्याने काही इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. असे असले तरी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा विश्वास व्यक्त करत भावी आमदार गाठीभेटी, दौरे करताना दिसत आहेत. ही परिस्थिती कोणाएका मतदारसंघाची नसून जिल्ह्यातील सहाही ठिकाणची आहे.

राज्यातील राजकीय घडामोडी झाल्यानंतर बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. यावेळी युतीकडे आमदार, खासदार असतानाही केवळ जातीय राजकारण झाल्याने त्यांना फटका बसला. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे विजयी झाल्याने या पक्षातील लोकांचा विश्वास वाढला आहे. आता आगामी विधानसभा निवडणूक अनुषंगाने हे दोन्ही गट कामाला लागले आहेत. आपल्या मतदारसंघात आपलीच ताकद जास्त आहे, आपलीच लोकप्रियता आहे, असे दाखविण्यासह गाठीभेटी घेण्यात सर्वच इच्छुक व्यस्त आहेत. असे असले तरी ही गर्दी पाहून पक्षश्रेष्ठी नेमकी उमेदवारी कोणाला देणार? हे वेळेनुसार समजणारच आहे.

माझीही उमेदवारी जाहीर नाही - धनंजय मुंडे
बीड शहरात धनंजय मुंडे यांच्या उपस्थिती पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा मागील आठवड्यात झाला. यामध्ये त्यांनी जिथे ज्या पक्षाचा आमदार, ती जागा त्याच पक्षाची असे सुनिश्चित झाले आहे. त्यामुळे उर्वरित जागांची वाटाघाटी होईल. अद्याप माझीही परळीची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे योग्य वेळेला योग्य उमेदवाराची घोषणा होईल, असे सांगितले. यामुळे जेथे भाजप आमदार आहेत, तेथील राष्ट्रवादीचे आणि जेथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तेथील भाजपचे इच्छुक अस्वस्थ आहे.

शिंदे गटाचा केवळ बीडवर दावा
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी एक असताना सहाही ठिकाणी त्यांचे उमेदवार दिले होते. त्यातील आष्टी, माजलगाव, परळी आणि बीडमध्ये विजय झाला होता. तर केज आणि गेवराईत पराभव झाला होता. युतीकडून बीडवगळता पाच ठिकाणी उमेदवार होते. त्यातील गेवराई आणि केजमध्ये विजय झाला होता. शिवसेनेचा बीडमध्ये पराभव झाला होता. युती असताना बीड मतदारसंघावर कायम शिवसेनेने दावा केलेला आहे. यावेळीही युतीकडून शिवसेना शिंदे गट दावा करत आहे. तर आघाडीकडूनही ठाकरे गट दावा करताना दिसत आहे. परंतु येथे आगोदरच राष्ट्र्वादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे नेमकी जागा कोणाला मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.

जयंत पाटील यांचेही सूचक वक्तव्य
लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षांचे जिथे खासदार होते, तेथे त्यांना प्राधान्य देण्यात आले. आता विधानसभासंदर्भात असे काही ठरले नाही. परंतु तीच लाइन पकडू, असे सूचक विधान करत त्यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचाच उमेदवार असेल, असे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. इतर मतदारसंघात मात्र त्यांना नव्याने उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे.

काेणत्या मतदारसंघातून कोण इच्छुक
बीड

भाजप - राजेंद्र मस्के
शिवसेना शिंदे गट - अनिल जगताप
राष्ट्रवादी अजित पवार गट - डॉ. योगेश क्षीरसागर, बळीराम गवते
शिवसेना ठाकरे गट - परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर
राष्ट्रवादी शरद पवार गट - संदीप क्षीरसागर
इतर- डॉ. ज्योती मेटे, जयदत्त क्षीरसागर, सुरेश नवले, सीए बी. बी. जाधव, कुंडलिक खांडे

माजलगाव
भाजप - रमेश आडसकर, मोहन जगताप, नितीन नाईकनवरे, बाबरी मुंडे
शिवसेना शिंदे गट - तुकाराम येवले
राष्ट्रवादी अजित पवार गट - प्रकाश सोळंके, जयसिंह सोळंके, अशोक डक
राष्ट्रवादी शरद पवार गट - मनोहर डाके, चंद्रकांत शेजूळ, नारायण डक, राधाकृष्ण होके पाटील, सहाल चाऊस, शेख मंजूर
इतर - माधव निर्मळ, ओमप्रकाश शेटे, अप्पासाहेब जाधव
शिवसेना ठाकरे गटाचे सध्यातरी कोणी नाही

केज
भाजप - नमिता मुंदडा, संगीता ठोंबरे
शिवसेना शिंदे गट - डॉ. अंजली घाडगे
शिवसेना ठाकरे गट - डॉ. नैना सिरसाट
राष्ट्रवादी शरद पवार गट - पृथ्वीराज साठे, नवनाथ शिंदे
इतर - डॉ. राहुल शिंदे, अशोक वाघमारे, रमेश गालफाडे,
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सध्यातरी कोणी नाही.

आष्टी
भाजप - सुरेश धस, भीमराव धोंडे,
राष्ट्रवादी अजित पवार गट -बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे
राष्ट्रवादी शरद पवार गट - राम खाडे, साहेबराव दरेकर
इतर - अण्णा चौधरी, अमोल तरटे, किशोर हंबरडे, एन. एल. जाधव
शिंदे गट व ठाकरे गटाचे सध्यातरी कोणी नाही.

गेवराई
भाजप - लक्ष्मण पवार
राष्ट्रवादी अजित पवार गट - विजयसिंह पंडित
शिवसेना ठाकरे गट - बदामराव पंडित
शिंदे गट, शरद पवार गट यांच्यासह अपक्ष दावेदार सध्यातरी नाही.

परळी
राष्ट्रवादी अजित पवार गट - धनंजय मुंडे
राष्ट्रवादी शरद पवार गट - राजेभाऊ फड, ॲड. माधव जाधव, फुलचंद कराड, सुदामती गुट्टे,
काँग्रेस - राजेसाहेब देशमुख
इतर - प्रा. टी. पी. मुंडे
भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट सध्या तरी कोणी नाही.

Web Title: Constituency one and contenders many; Who will get candidature for assembly from Beed district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.