बांधकाम साहित्य रस्त्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:29+5:302021-06-05T04:24:29+5:30
पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करावी अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथील परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते वाहून गेले आहेत. वाहून ...
पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करावी
अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथील परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते वाहून गेले आहेत. वाहून गेलेले हे रस्ते शासनाने दुरुस्त करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी. सध्या रस्ते वाहून गेल्याने शेतात येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतात ट्रॅक्टर, दुचाकी वाहने व इतर वाहने जात नसल्याने शेतीची अनेक कामे खोळंबली आहेत. याबाबत गांभीर्याने घेऊन रस्त्यासाठी पर्याय तयार करावा, अशी मागणी होत आहे.
झुडपे वाढल्याने नागरिकांना त्रास
पाटोदा : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यानजीक काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यावर्षी मोठ्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साठलेले राहिल्याने परिसरात काटेरी झुडपांची मोठी वाढ झाली. आता ही झुडपे रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. अनेकांना या काटेरी झुडपामुळे इजाही झालेली आहे.
रस्ते खोदून ठेवल्याने वाहनांचे नुकसान
अंबाजोगाई : शहर व परिसरात तसेच ग्रामीण भागात रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. तसेच लहान मोठे मातीचे ढीग यामुळे एसटी बस व खासगी वाहने आदळून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अंबाजोगाई आगाराच्या बस आदळून खिळखिळ्या झाल्या आहेत. यासाठी या रस्त्याची दुरूस्ती लवकर करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मास्कची चढ्या भावाने विक्री
अंबाजोगाई : शहरातील औषध दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखवला जातो; अन्यथा ते चढ्या भावाने विकले जातात. तसेच दोन पदरी आणि तीन पदरी मास्क किमतीच्या दुपटीपेक्षा अधिक दराने विक्री केली जाते. याचा मोठा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तर मास्कसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे सामान्य ग्राहकांची लुबाडणूक होत आहे.
कोरोना नियमांची होतेय पायमल्ली
बीड : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही नागरिक बिनधास्त मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. नागरिकांनी मास्क लावून गरज असेल तरच फिरावे, असे आवाहन केले जात आहे. तरीही याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असून, धोका वाढत चालला आहे. तरीही काही नागरिक विनामास्क फिरत असल्यामुळे धोका वाढतच चालला आहे.