५० हजार पक्क्या मतदारांची बांधणी आली कामी; प्रकाश सोळंकेंनी जिंकली पाचवी आमदारकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 08:08 PM2024-11-26T20:08:53+5:302024-11-26T20:09:41+5:30

माजलगाव तालुक्यामध्ये मोहन जगताप यांना चांगलीच आघाडी मिळाली; परंतु धारूर तालुक्याची मतमोजणी सुरू झाली तेव्हा मोहन जगताप यांचे मताधिक्य घटत होते.

Construction of 50,000 fixed voters has come to fruition; Prakash Solanke won the fifth MLA | ५० हजार पक्क्या मतदारांची बांधणी आली कामी; प्रकाश सोळंकेंनी जिंकली पाचवी आमदारकी

५० हजार पक्क्या मतदारांची बांधणी आली कामी; प्रकाश सोळंकेंनी जिंकली पाचवी आमदारकी

- पुरुषोत्तम करवा
माजलगाव :
मतदारसंघात अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी पाचव्यांदा विजय मिळवला. त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोहन जगताप यांचा ५ हजार २०४ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत मोहन जगताप दुसऱ्या, तर रमेश आडसकर हे तिसऱ्या स्थानी राहिले.

केसापुरी वसाहत येथील शासकीय वसतिगृह या ठिकाणी सकाळी नऊ वाजता पहिल्या फेरीची मतमोजणी जाहीर करण्यात आली; तर पोस्टल मतदानही शेवटी मोजण्यात आले. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये प्रकाश सोळंके थोड्या मतांनी पुढे होते; परंतु तिसऱ्या फेरीपासून मोहन जगताप यांनी आघाडी मिळवली होती. माजलगाव तालुक्यामध्ये मोहन जगताप यांना चांगलीच आघाडी मिळाली; परंतु धारूर तालुक्याची मतमोजणी सुरू झाली तेव्हा मोहन जगताप यांचे मताधिक्य घटत होते. अठराव्या फेरीनंतर प्रकाश सोळंके पुढे गेले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांना ६६ हजार २११, महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांना ६१ हजार ७, अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांना ३७ हजार १६८, माधव निर्मळ यांना ३३ हजार ७९९, तर बाबरी मुंडे यांना १७ हजार ३९५ मते मिळाली. आमदार प्रकाश सोळंके यांचा हा पाचवा विजय होता. त्यांच्या विजयाची मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली.

विजयाची कारणे
-यापूर्वी चारवेळा आमदार राहिल्यामुळे मतदारांशी संपर्क दांडगा.
-नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा
-५० हजार पक्के मतदार
-विरोधी उमेदवार सक्षम नव्हते

दोन नंबरच्या उमेदवाराच्या पराभवाची कारणे
-पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली.
-पाच वर्षांत मतदारांचा संपर्क कमी.
-उमेदवारी उशिरा मिळाल्यामुळे प्रचाराला पुरेसा वेळ मिळाला नाही.
-शरद पवार यांची सभा रद्द झाल्याने जनतेत वेगळाच संदेश.

Web Title: Construction of 50,000 fixed voters has come to fruition; Prakash Solanke won the fifth MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.