सोनीमोहा येथे लोकसहभागातून बांधलेल्या बंधा-यामुळे पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 07:19 PM2017-12-26T19:19:16+5:302017-12-26T19:25:16+5:30
तालुक्यातील सोनीमोहा येथील नदीवर शेतकर्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून सोनी नदीवर पॉलिथिन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्यामुळे नदी पात्रात मोठा पाणीसाठा झाला आहे. तसेच लगतच्या विहिरींची पाणीपातळी दोन फुटांपेक्षा अधिक वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
धारुर (बीड) : तालुक्यातील सोनीमोहा येथील नदीवर शेतकर्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून सोनी नदीवर पॉलिथिन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्यामुळे नदी पात्रात मोठा पाणीसाठा झाला आहे. तसेच लगतच्या विहिरींची पाणीपातळी दोन फुटांपेक्षा अधिक वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील सोनीमोहा, जहांगीरमोहा व आंबेवडगाव शिवारातून सोनी नदी वाहते. नदीला पावसाळ्यानंतर दरवर्षी दोन ते तिन महिने पाणी असते. वाहते पाणी सिमेंट बंधारे बांधून अडविल्यास रबी पिकास त्याचा फायदा होतो. मागील दोन वर्षापूर्वी मंत्री गिरीश बापट यांनी दुष्काळी दौरा या परिसरात केला होता. या वेळी सोनीमोहाकरांनी सोनी नदीवर सिमेंट बंधारे बांधावेत अशी मागणी केली होती. ग्रामस्थांच्या मागणीवरुन तीन ठिकाणी सिमेंट बंधारे मंजूर झाले होते. यासाठी ५० लक्ष रुपये निधीही मंजूर झाला होता. मात्र, अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याने मागील वर्षात सिमेंट बंधार्याच्या कामाच्या निविदा न काढल्याने कामे झालीच नाहीत.
या वर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता. पावसानंतर सोनी नदीला स्वच्छ पाणी खळखळू लागले आहे. सिमेंट बंधारे वेळीच बांधले असते तर याचा शेतीसाठी फायदा झाला असता. वाहून जाणारे पाणी वेळीच अडवावे म्हणून संदीपान तोंडे यांनी पुढाकार घेऊन शेतकर्यांना पॉलिथिन बंधार्याविषयी माहिती दिली. येथील शेतकरी कोंडीबा तोंडे, भगवान तोंडे, इंदर तोंडे यांनी एकत्र येऊन नदीवर लोकसहभागातून गावालगत पूर्वेस पाहणी केली. दोन दिवसांपूर्वी नदीवर जेसीबीच्या सहाय्याने माती भराव टाकून त्यावर १०० फूट लांब व १२ फूट रुंद पॉलिथिन वापरुन बंधारा उभारला आहे. नदीपात्रात मोठा पाणीसाठा झाला असून, परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. तसेच गावातील आड व बोअरला फायदा होणार आहे. बंधारा उभारणीसाठी परमेश्वर राऊत, शेख अब्बास, गणपती तोंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
रबीच्या पिकांना होणार फायदा
सोनी नदीवर शेतकर्यांनी पॉलिथिन बंधारा उभारला आहे. वाहून जाणारे पाणी अडविण्यात आल्याने मोठा साठा झाला आहे. यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी दोन फुटांपेक्षा अधिक वाढली आहे. रबीच्या पिकांना याचा फायदा होणार आहे.
- भगवान रामभाऊ तोंडे, शेतकरी, सोनीमोहा