बांधकाम कामगारांच्या उपासमारीची धग पोंचली माजलगाव तहसीलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 04:54 PM2018-03-27T16:54:04+5:302018-03-27T16:54:04+5:30
वाळु बंद असल्यामुळे शहर व परिसरातील सर्वच बांधकामे मागील दोन महिन्यांपासुन बंद आहेत. मात्र, यामुळे या कामावर अवलंबून असणा-या बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
माजलगाव (बीड ) : वाळू बंद असल्यामुळे शहर व परिसरातील सर्वच बांधकामे मागील दोन महिन्यांपासुन बंद आहेत. मात्र, यामुळे या कामावर अवलंबून असणा-या बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, महाराष्ट्र ईमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणी कार्यालय शहरात सुरु करावे या मागणीसाठी कामगारांनी आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
तालुक्यातील फक्त एकाच वाळू घाटाच्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित घाटाची प्रक्रिया रखडली आहे. सध्या एकाच ठिकाणाहुन वाळू असल्याने याचे दर मोठ्याप्रमाणावर वाढले आहेत. महसुल व पोलीस प्रशासनाने चोरट्या वाळू वाहतुकीवर अंकुश बसविल्यामुळे वाळूची उपलब्धता दुरापास्त झाली आहे. प्रशासनाकडून टेंडर धारकांसह वाहनधारकांना नियमाची यादी दाखवण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारक व लिलाव धारकांकडून अव्वाच्यासव्वा दराने वाळूची विक्री होत आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्यांना बांधकाम करणे कठीण झाले आहे. तर आधीची बांधकामे ठप्प पडली आहेत. मात्र, या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम थेट हातावर पोट असणाऱ्या बांधकाम कामगार व मजुरांवर होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
यामुळे कामगारांनी बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, महाराष्ट्र ईमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणी कार्यालय शहरात सुरु करावे या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान मोंढा भागातून मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला. मोर्चात बांधकामाशी संबंधीत सर्व व्यापारी, विविध संघटना आदींचे पदाधिकारी सामिल होते. तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर तहसीलदार एन. जी. जंपलवाड यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर मोर्चेक-यांच्या प्रतिनिधी मंडळाने उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मोर्चाचे नेतृत्व निलेश काकडे, शेख शकील, शेख करीम, भास्कर घाडगे, मुज्जुभाई आदींनी केले. तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, अनंत रुद्रवार, गणेश लोहिया, सुंदर साखरे, संजय सोळंके, सुभाष इंदाणी, संदेश चिद्रवार, सुधाकर देशमुख, सययद कालुभाई , मोगरेकर फरशीवाला, मिर्झा जफर बेग आदींनी सहभाग घेतला. संपूर्ण शहर व्यापलेल्या या मोर्चाची सर्वत्र चर्चा होती.
जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करू
वाळु अभावी बांधकाम व्यवसायिक तसेच मजुरांची होत असलेली परवड आम्ही जाणुन आहोत. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना माहिती देऊन उर्वरित वाळु घाटाचे लिलाव त्वरित करावेत अशी मागणी करण्यात येईल.
- प्रियंका पवार, उपविभागीय अधिकारी, माजलगांव