कोणत्याही क्षेत्रात ग्राहक हाच महत्त्वाचा घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:26 AM2020-12-26T04:26:22+5:302020-12-26T04:26:22+5:30
न्या. के. यू. तेलगावकर : विधी सेवा प्राधिकरणात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्रबोधन बीड : खाद्यपदार्थांवर कालबाह्य दिनांक टाकणे व ...
न्या. के. यू. तेलगावकर : विधी सेवा प्राधिकरणात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्रबोधन
बीड : खाद्यपदार्थांवर कालबाह्य दिनांक टाकणे व त्यातील घटक पॅकिंगवर नमूद करणे बंधनकारक आहे. परंतु ही बंधने व्यापाऱ्यांसाठी हानीकारक नाहीत तर ती उपयोगी आहेत. कोणत्याही क्षेत्रात ग्राहक हा सर्वात महत्वाचा असतो, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रभारी सदस्य सचिव तथा २ रे सह दिवाणी न्या.के. यू. तेलगावकर यांनी केले.
बीड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमध्ये किमान समान कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य आबासाहेब हंगे, ग्राहक पंचायतचे आर. टी. गर्जे उपस्थित होते. ॲड.एन.एम.कुलकर्णी, ॲड. सारिका कुलकर्णी, जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी, विधीज्ञ, पक्षकार आदी यावेळी उपस्थित होते.
ॲड. कुलकर्णी यांनी ग्राहक चळवळ आणि ग्राहक संरक्षण कायद्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली. ऑनलाइन खरेदी विक्रीसाठी सुुध्दा या कायद्यान्वये दाद मागता येते, असे सांगितले. उपप्राचार्य हंगे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनावर मार्गदर्शन केले. त्यांनी बिंदू माधव जोशी यांनी ग्राहक संरक्षण कायद्यासंदर्भात चळवळ सुरू केली. प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक व विक्रेता असतो, त्यामुळे ग्राहकाने जागृत होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मानव कल्याणासाठी राष्ट्रीय ग्राहक दिनाची सुरूवात कशी झाली, हे त्यांनी सविस्तर सांगितले. ग्राहक कायद्याचे प्रबोधन, जागृती आणि विस्तार करणे गरजेचे असून यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होईल, ग्राहक जागृती झाली पाहिजे हा ग्राहक दिनाचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रा. गर्जे यांनी भारतीय संस्कृतीचा संबंध ग्राहक संरक्षण कायद्याशी कसा आहे, हे स्पष्ट करून समाज व ग्राहकांच्या प्रबोधनासाठी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी न्या. तेलगावकर यांनी अन्न आणि औषधांच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन ॲड. सारिका कुलकर्णी यांनी केले. प्राधिकरणचे लिपिक एस. बी. केचाळे यांनी आभार मानले.