वैद्यनाथ मंदिरातील दर्शन सेवा सुरक्षित उपाय करून सुरू ठेवा - A - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:26+5:302021-03-25T04:31:26+5:30
परळी : राज्यातील इतर ठिकाणची मंदिरे दर्शनासाठी खुली असताना प्रभू वैद्यनाथ मंदिरच बंद कशामुळे, असा सवाल करत ते ...
परळी : राज्यातील इतर ठिकाणची मंदिरे दर्शनासाठी खुली असताना प्रभू वैद्यनाथ मंदिरच बंद कशामुळे, असा सवाल करत ते खुले करण्याची मागणी प्रभू वैद्यनाथ देवस्थान विकास कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
राज्यात कोरोनाच्या संसर्गाची लाट सर्वत्रच आलेली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महाशिवरात्रीच्या अगोदरच बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरातील दर्शन सेवा पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले होते आणि आता त्या आदेशाच्या कालावधीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणांत परिस्थिती सारखीच आहे. राज्याच्या विविध भागांतील महत्त्वाची मंदिरे, व्यापारी संकुले (शॉपिंग मॉल), पर्यटन स्थळे आवश्यक ते काळजीचे उपाय करून सुरू ठेवण्यात आले आहेत. मंदिरातील दर्शन सुविधासुद्धा भाविकांसाठी उपलब्ध आहे. अशा स्थितीत प्रभू वैद्यनाथ मंदिरात सॅनिटायझर, मास्क व योग्य सामाजिक अंतर ठेवण्यासाठी उपाययोजना करून दर्शन सुविधा भाविकांसाठी सुरू ठेवण्याची मागणी चंदुलाल बियाणी यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व पालकमंत्री धनंजय मुंडे यांना पाठविले आहे.