प्रिंट मीडियाची विश्वासार्हता कायम : सुधीर महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:21 AM2019-01-07T00:21:10+5:302019-01-07T00:21:37+5:30
विश्वासार्हतेमुळे प्रिंट मीडियाचे भविष्य कायम टिकून राहील, असे मत लोकमतचे संपादक सुधीर महाजन यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सोशल मीडियाचे आव्हान नव्हते आणि राहणारही नाही. परंतु तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन प्रिंट मीडियाला कार्यतत्पर (अपडेट) व्हावे लागेल. सोशल मीडियात आधाराबाबत विश्वासार्हता नसल्याने समाजमान्यता मिळत नाही, यातून अनेक सामाजिक धोके आहेत. विश्वासार्हतेमुळे प्रिंट मीडियाचे भविष्य कायम टिकून राहील, असे मत लोकमतचे संपादक सुधीर महाजन यांनी व्यक्त केले.
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न बीड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि जिल्हा संपादक संघाच्या वतीने आयोजित दर्पण दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर विभागीय माहिती संचालक यशवंत भंडारे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे उपस्थित होते.
‘प्रसार माध्यमे आणि सोशल मीडिया’ या विषयावर बोलताना महाजन म्हणाले, पूर्वी व्यक्त होण्याचे माध्यम कमी व मर्यादा होती. मात्र सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून लोक व्यक्त होत आहेत हे त्याचे बलस्थान असून त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर झाला तरच प्रिंट मीडियाला ते आव्हान ठरू शकेल, मात्र तसे होत नाही. प्रिंट मीडियाला कायदा, चौकट आणि मर्यादा आहे. सोशल मीडिया जे घडलं तेवढंच सांगणार; मात्र आता प्रिंट मीडियाला विश्लेषणाबरोबरच तंत्रज्ञानाचा अवलंब करुन स्मार्ट बनून हाताळणे महत्वाचे ठरणार आहे. काळानुसार बदललेल्या तंत्रज्ञानाचा आवाका मोठा आहे. या वेगाबरोबर धावण्यासाठी प्रिंट मीडियाला अपडेट व्हावे लागेल, असे मत मांडताना शोध पत्रकारिता विसरु नका, असेही त्यांनी सुचविले.
कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक अनंत हंबर्डे, नागनाथ सोनटक्के, राजेंद्र आगवान यांचा सत्कार झाला. प्रास्ताविक राज्य सरचिटणीस अनिल महाजन यांनी केले. सूत्रसंचालन अलोक कुलकर्णी यांनी केले. प्रमोद कुलकर्णी यांनी आभार मानले.
यावेळी संपादक नरेंद्र कांकरिया, दिलीप खिस्ती, सर्वोत्तम गावरस्कर, राजेंद्र होळकर, गुलाब भावसार, कमलाकर कुलथे, रामचंद्र जोशी तसेच शहर व जिल्हाभरातून आलेले पत्रकार उपस्थित होते.
यशवंत भंडारे यांनी माध्यमांचे स्वरुप बदलत आहे. विश्वासाहर्ता टिकवून जोरकसपणे विषय मांडणी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या काळातील आव्हाने स्वीकारताना स्वत:लाच नियम, चौकट घालून काम करावे लागेल, असे मत त्यांनी मांडले.
नामदेवराव क्षीरसागर म्हणाले, पत्रकारिता करताना समाजाच्या आर्थिक, भौतिक विकासासाठी आपण काही देतो का याचे चिंतन करणे गरजेचे आहे.
चंद्रकांत सूर्यवंशी यांनी स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारितेचे मोठे योगदान असल्याचे सांगून आजच्या काळात वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह पत्रकारितेची गरज असल्याचे ते म्हणाले.
अशोक देशमुख यांनी पूर्वीच्या तुलनेत पत्रकारिता सोपी झाली असली तरी शोध पत्रकारिता कमी झाल्याचे मत मांडले.