कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचाच इन्शुरन्स नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:54 AM2021-05-05T04:54:33+5:302021-05-05T04:54:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. रोज नवीन रुग्णांची संख्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. रोज नवीन रुग्णांची संख्या हजारी पार जात आहे. दोन दिवस हीच संख्या दीड हजारी पार गेली होती. वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात आलेली आहे. हे सर्व कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत; परंतु त्यांचा इन्शुुरन्सच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५७ हजाराच्यावर गेली आहे, तसेच मृत्यूदेखील हजाराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून आरोग्य विभागाने तीन महिन्यांच्या कंत्राटावर विविध पदावर भरती केली होती. यात शेकडो कर्मचारी भरती केले; परंतु त्यांचा सुरुवातीपासूनच इन्शुरन्स नाही. हे सर्व कर्मचारी जीव धोक्यात घालून कोरोनाच्या लढ्यात सहभागी आहेत. असे असले तरी शासन अथवा प्रशासन त्यांची कोठेही दखल घेत नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी हे सर्व कर्मचारी एकत्र येत रिक्त पदांवर भरती करण्याबाबत मागणी करत होते. मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह आरोग्य मंत्र्यांनाही निवेदने दिली; परंतु त्यांना केवळ आश्वासने देण्यात आली होती. अद्याप यावर काहीच कारवाई नसल्याने संताप आहे.
कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर
सध्या हे कर्मचारी नियमित कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत आहेत. अनेकदा त्यांच्यापेक्षाही जास्त काम करताना दिसतात; परंतु त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच हिताचे निर्णय नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
बीडमधील कर्मचाऱ्यास तीन महिन्यांचे कंत्राट
n कोरोनाकाळात भरती केलेल्या लोकांना तीन महिन्यांचे कंत्राट देण्यात आलेले आहे. मध्यंतरी रुग्णसंख्या कमी झाल्याने कर्मचारी कमी करण्यात आलेले होते.
nआता मार्च महिन्यापासून पुन्हा रुग्णसंख्या गतीने वाढताना दिसत आहे. हाच धागा पकडून पुन्हा पदभरती करण्यात आली. या सर्व कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे कंत्राट देण्यात आलेले आहे.
n यात वॉर्डबॉय, डाटा एन्ट्री ऑपरेटर, परिचारिका, डॉक्टर, मॅनेजर आदी लाेकांचा समावेश आहे. या सर्वांना केवळ तीन महिन्यांची नियुक्ती असून, पुन्हा रिनीव्ह केली जाणार आहे.
आतापर्यंत १०० पेक्षा जास्त कर्मचारी पॉझिटिव्ह
n कोरोनासारख्या संकटात कंत्राटी कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. या सेवेदरम्यान आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. काहींनी कोरोनावर मात करीत पुन्हा सेवा सुरू केली आहे.
n एवढी जोखीम पत्कारून सेवा करूनही या कर्मचाऱ्यांना शासन अथवा आरोग्य विभागाकडून कसलीच सुरक्षा नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.
शासकीय सेवेत सामावून घ्या
n कोरोनाच्या पहिल्या लाटेत शेकडो कर्मचारी भीती असतानाही काम करत होते. त्यानंतर त्यांना कमी करण्यात आले. याचवेळी आरोग्य विभागात पदभरती निघाली होती.
n याच भरतीमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. तर शासनानेही यांचा विचार करू, असे सांगितले होते; परंतु अद्याप काहीच झालेले नसल्याचे दिसते.
काय म्हणतात कर्मचारी..
आम्ही नुकतेच भरती झालो आहोत; परंतु तरीही आम्हाला विमा कवचबद्दल काहीच सांगितलेले नाही. आम्ही कोरोनाच्या या संकटात काम करत आहोत. रुग्णालयात राहून सर्व डाटा एन्ट्री करण्याचे काम आम्ही करतो. आमचा इन्शुरन्स काढण्यात यावा.
-डाटा एन्ट्री ऑपरेटर, जिल्हा रुग्णालय, बीड.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तीन महिने काम केले. त्यानंतर मला कमी करण्यात आले. आता पुन्हा एक महिन्यापासून भरती केले आहे. आजही मी कोरोना वॉर्डात जावून सर्व सफाई करतो. थेट रुग्णांच्याही संपर्कात येतो. जीव धोक्यात घालून काम करत आहोत.
वॉर्ड बॉय, जिल्हा रुग्णालय, बीड.
कोरोनाबाधित असो वा संशयित. सर्वांची काळजी घेण्यात परिचारिका पुढे असतात. आम्हीही नियमित परिचारिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो; परंतु आमचा इन्शुरन्स नसल्याचे सांगण्यात येते. वरिष्ठ काढतील, या भीतीने आम्ही विचारायलाही जात नाहीत.
-परिचारिका, कोरोना वॉर्ड.