मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस
By सोमनाथ खताळ | Updated: April 18, 2025 10:56 IST2025-04-18T10:56:09+5:302025-04-18T10:56:49+5:30
महानिरीक्षकांची कारवाई : आज सकाळी पुण्यातून घेतले बीड पोलिसांनी ताब्यात

मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस
बीड : येथील सायबर पोलिस ठाण्यातील वादग्रस्त निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. तो गुरूवारी रात्री उशिरा पोलिसांना शरण येणार होता, परंतू तसे न करता तो एका लॉजवर जावून झोपला. आज सकाळी बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. परंतू त्या आधीच गुरूवारी रात्री छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी कासले याला पोलिस खात्यातून डिसमीसचे आदेश काढले. अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी ही माहिती दिली.
रणजित कासले हा सायबर पोलिस ठाण्यात असताना विनापरवानगी आरोपीला घेऊन गुजरातमध्ये गेला होता. तेथे त्याने पैसे घेतल्याचा आरोप झाल्यने २६ मार्च रोजी त्याला निलंबित केले होते. त्यानंतर कसले याने अनेक व्हिडीओ व्हायरल केले होते. यातील एकामध्ये त्याने एका समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणी बीडमधील वकिलाच्या फिर्यादीवरून १४ एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिस त्याच्या मागावर होते. परंतू तो सापडत नव्हता, उलट त्याने महाराष्ट्र पोलिसांना हिंमत असेल तर पकडून दाखवा, असे आव्हान दिले होते. परंतू गुरूवारी रात्री तो पुण्यात आला. विमानतळावरच त्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने पुन्हा एकदा सरकार आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यावर आरोप केले. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यावरही सडकून टिका केली.
'गब्बर इज बॅक' असे स्टेटस
गुरूवारी सकाळी कासले याने सोशल मिडीयावरून काही रिल्स व्हायरल केल्या. यात त्याने 'गब्बर इज बॅक' असे लिहून चारचाकी वाहनाची स्पीड १५७ पर्यंत असल्याचे दाखविले. याच वाहनात त्याने आपली पोलिसची टोपीही समोर ठेवल्याचे दिसत आहे. निलंबणानंतरही समोर टोपी ठेवून तो इतरांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता.
बीड पोलिसांना घुमवले
ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कासलेच्या मागावर धावले. परंतू त्यांनाही तो सापडला नाही. वेगवेगळे ठिकाण सांगून त्याने बीड पोलिसांना दोन दिवस चांगलेच घुमवले. गुरूवारीही तो शरण येणार असे, सांगितले होते, परंतू त्याने पुन्हा एकदा चकवा दिला. परंतू बीड पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका लॉजमधून कासले याला ताब्यात घेतले.