श्रीक्षेत्र कपिलधार यात्रा उत्सवास सुरुवात; भाविकांच्या सोयीसाठी बीड जिल्ह्यातून ७५ लालपरी
By अनिल भंडारी | Published: November 25, 2023 02:13 PM2023-11-25T14:13:14+5:302023-11-25T14:19:43+5:30
बीड जिल्ह्यातील सर्व आगारांतून बसचे नियोजन करण्यात आले आहे
बीड : कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र कपिलधार यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातून ७५ बसचे नियोजन करण्यात आले आहे. २५ ते २७ नोव्हेंबर या यात्रा कालावधीत कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र कपिलधार येथे यात्रा भरणार आहे. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात भाविक भक्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून तसेच इतर राज्यांतून श्रीक्षेत्र कपिलधार येथे येतात. त्यांच्या प्रवास सुविधेसाठी रापमच्या बीड विभागाच्या वतीने ७५ बसचे नियोजन करण्यात आलेले आहे.
एसटी बसनेच प्रवास करावा
७५ बस कपिलधार मांजरसुंबा ते अंबाजोगाई- परळी-लातूर-अहमदपूर या मार्गांवर धावणार आहेत. प्रवाशांनी, भाविकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करावा असे आवाहन विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे, विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळ यांनी केले.
परळी आगारातून १८ बसचे नियोजन
परळी वैजनाथ येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी तेथून श्री क्षेत्र कपिलधार येथे दर्शनासाठी जातात. प्रवाशांच्या सुविधेसाठी परळी आगारातून अठरा बसचे नियोजन केल्याची माहिती आगार प्रमुख संतोष महाजन यांनी दिली.
पंढरपूर यात्रा सेवेलाही प्रतिसाद
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी बीड विभागातून ९० बसचे नियोजन केले होते. तर, नारायणगड यात्रेसाठी १३ बसचे नियोजन केले होते. बीड व धारूर आगारातून प्रत्येकी १५, तर परळी, माजलगाव, गेवराई, पाटोदा, आष्टी व अंबाजोगाई आगारातून दहा अशा एकूण ९० बसचे नियोजन केले होते. या बसला भाविकांचा प्रतिसाद मिळाला तसेच रापमच्या उत्पन्नात भर पडली.
आगार- बस संख्या
बीड -१०
धारूर - १०
परळी - १८,
माजलगाव -७
गेवराई -७
पाटोदा -७
आष्टी - ५
अंबाजोगाई -११
एकूण - ७५