बीडमध्ये पोलीस कुटुंबांसाठी साकारतेय सुविधायुक्त उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:22 AM2018-01-31T00:22:56+5:302018-01-31T00:23:53+5:30
बीड : वॉकिंग ट्रॅक, बसण्याची सुविधा, खेळण्यासाठी मैदान, खेळणी, हिरवेगार लॉन आणि शोभेसाठीची परंतु सुगंधीत अशी रंगीबेरंगी फुलांची झाडे ...
बीड : वॉकिंग ट्रॅक, बसण्याची सुविधा, खेळण्यासाठी मैदान, खेळणी, हिरवेगार लॉन आणि शोभेसाठीची परंतु सुगंधीत अशी रंगीबेरंगी फुलांची झाडे असणारे सोयी सुविधायुक्त उद्यान पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कर्मचा-यांच्या निवासस्थान परिसरात होत साकारत आहे. याचे काम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात याचा लोकार्पन सोहळा पार पडणार आहे. पोलीस अधिकारी, कर्मचाºयांसह त्यांच्या पाल्यांना याचा लाभ होणार आहे.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. क्षेत्रीय कार्यालय सोलापूर यांच्या वतीने राज्यात तीन ठिकाणी पोलीस उद्यान विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये सोलापूर, हिंगोली व बीडचा समावेश होता. पोलीस महासंचालकांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला होता. बीडमध्ये २ जुलै रोजी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या उपस्थितीत या उद्यानाचे भूमिपूजन झाले होते.
जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस कार्यरत असणाºया पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना व त्यांच्या पाल्यांसाठी बीडमध्ये सुविधायुक्त उद्यान नव्हते. त्यामुळे त्यांच्या खेळण्यासह इतर समस्यांना तोंड द्यावे लागत होते. परंतु अधीक्षक श्रीधर यांच्या पुढाकारातून बीडमध्ये हे उद्यान साकारण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्याप्रमाणे याला मंजूरी मिळाली आणि कामाला सुरूवात झाली होती. किरकोळ कामे वगळता उद्यान उभारणी जवळपास पूर्ण झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यात याचा लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याचे श्रीधर यांनी सांगितले.
वापरा आणि काळजी घ्या
बीड शहरात पहिल्यांदाच अशाप्रकारे सर्व सोयीसुविधायुक्त उद्यान साकारत आहे. याचा वापर करण्याबरोबरच त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारीही पोलीस अधिकारी, कर्मचाºयांची आहे. आपले उद्याने आहे, असे समजून वापर केला तर याची शोभा टिकून राहिल, असेही अधीक्षक जी.श्रीधर म्हणाले.
उद्यानात असतील या सुविधा
६० बाय ५० मिटरमध्ये साकारत असलेल्या या उद्यानात गार्डन, ट्रॅक, खेळणी, मैदान, बाकडे, पथदिवे, फुलांची झाडे, कंपाऊंड वॉल, सुरक्षा रक्षक, पिण्याचे पाणी आदी सुविधा असणार आहेत.
पोलीस अधिकारी, कर्मचाºयांसह त्यांच्या पाल्यांना याचा लाभ घेता येईल. उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पोलीस महासंचालक यांचा वेळ मिळताच पुढील महिन्यात याचा लोकार्पण सोहळा होईल.
- जी.श्रीधर
पोलीस अधीक्षक, बीड