सामाजिक संस्थांच्या उपक्रमामुळे शासकीय यंत्रणेला सहकार्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:56 AM2018-12-24T00:56:09+5:302018-12-24T00:56:23+5:30
सामाजिक संस्थाच्या सातत्यपूर्ण आरोग्य शिबिरांच्या आयोजनामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेस सहकार्यच मिळत असते. या संस्था सामाजिक जाणिवेतूनच काम करत असतात असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील रोटरी क्लब आॅफ बीडच्या माध्यमातून राबविण्यात येणारे सातत्यपूर्ण विविध सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत. सामाजिक संस्थाच्या सातत्यपूर्ण आरोग्य शिबिरांच्या आयोजनामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेस सहकार्यच मिळत असते. या संस्था सामाजिक जाणिवेतूनच काम करत असतात असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केले.
शनिवारी रोटरी क्लबच्या वतीने अहमदाबाद येथील प्रसिध्द शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.देवेंद्र शहा यांच्या उपस्थितीत मूळव्याध, भगंदर,फिशर व नासुर तपासणी व क्षारसूत्र पद्धतीने शस्त्रकिया शिबिरास प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, डॉ. अमित पाटील, डॉ. श्रीहरी लहाने, अॅड. प्रशांत देशपांडे, सूरज लाहोटी, प्रमोद निनाळ, रोटरी क्लबचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. आर. बी. पवार म्हणाले, एकविसाव्या शतकात ज्ञान आणि विज्ञान चौफेर प्रगती साधताना मानवता मात्र कमजोर होत आहे. अशा वेळी सामाजिक जाणिवा ठेवत रोटरी सारख्या संस्था सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेत आहेत. शासकीय यंत्रणे वर पडणारा ताण सामाजिक संस्थाच्या सातत्यपूर्ण आणि विविध आरोग्य शिबिरांमुळे हलका होतो व रूग्णांना मदत मिळते असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ.देवेंद्र शहा म्हणाले, आपल्यातील आहार, विहार, निद्रा या आरोग्याशी निगडीत बाबींचे संतुलन राहिले नसल्याने आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत. योग्य काळजी आणि आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास त्या नाहीशा होऊ शकतात, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ.श्रीहरी लहाने म्हणाले की विठाई हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरासाठी पुढाकार घेतला जातो. रूग्णसेवा हे ब्रीद आम्ही कायम जोपासत असून रूग्णांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते यावेळी म्हणाले.
शिबीरप्रमुख सूरज लाहोटी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विकास उमापूरकर यांनी केले तर आभार डॉ.आर. बी. घोडके यांनी मानले.
२२ वर्षांपासून गुजरातच्या डॉक्टरांची बीडमध्ये रुग्णसेवा
मूळव्याध, भगंदर, फिशर अशा व्याधींबाबत रुग्ण स्वत:हून फारसे बोलत नाहीत. परिणामी चुकीचे उपचार काही रुग्ण घेतात. नंतर त्याचे दुष्परिणाम जाणवतात. या गंभीर प्रश्नावर रोटरी क्लब आॅफ बीडने १९९५-९६ मध्ये हे शिबीर घेण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या अहमदाबाद येथील डॉ. देवेंद्र शहा हेही अशा शिबिरासाठी उत्स्फूर्तपणे पुढे आले. २२ वर्षांपासून दरवर्षी हे शिबीर आयोजित केले जाते. शिबिरासाठी स्वत: डॉ. देवेंद्र शहा व त्यांच्या २०- २५ सहकारी डॉक्टरांची टीम सेवा देतात. मोठ्या किंवा क्लिष्ट शस्त्रक्रियेसाठी संबंधित रुग्णाला अहमदाबादला बोलवून तेथे उपचार करतात. बीडमध्ये दरवर्षी शिबिरात १०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या जातात. यावर्षी १२५ पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी झाली. ८० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया होतील असे आयोजकांनी सांगितले.