कंपाऊंडवर चढून खिडकीवर उडी, ही जीवघेणी कसरत बारावीच्या पेपरच्या कॉप्या पुरविण्यासाठी

By सोमनाथ खताळ | Published: February 21, 2024 06:00 PM2024-02-21T18:00:29+5:302024-02-21T18:04:06+5:30

तेलगावच्या सरस्वती विद्यालयात कॉप्यांचा सुळसुळाट; खिडक्यांमधून पुरविल्या विद्यार्थ्यांना कॉप्या

Copies in HSC exam center of Telgaon's Saraswati Vidyalaya; Copies to students provided through windows | कंपाऊंडवर चढून खिडकीवर उडी, ही जीवघेणी कसरत बारावीच्या पेपरच्या कॉप्या पुरविण्यासाठी

कंपाऊंडवर चढून खिडकीवर उडी, ही जीवघेणी कसरत बारावीच्या पेपरच्या कॉप्या पुरविण्यासाठी

बीड : धारूर तालुक्यातील तेलगाव येथील सरस्वती विद्यालयातील परिक्षा केंद्रावर पहिल्याच पेपरला सर्रास कॉप्यांचा सुळसुळाट असल्याचे दिसले. शाळेच्या मागील बाजूने काही तरूण संरक्षण भिंतीवरून खिडक्यांवर जात होते. तेथून आतील विद्यार्थ्यांना कॉप्या देत असल्याचे कथीत व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. या प्रकाराने शाळेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून येथील केंद्र प्रमुखांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परिक्षेला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील १०२ केंद्रांवर ४१ हजार ५२ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. परीक्षेच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाल्याचे प्रशासनाने मंगळवारी सांगितले होते. कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचा दावा करण्यात आला होता. परंतू पहिल्याच पेपरला तेलगाव येथील सरस्वती शाळेतील परिक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. येथे पोलिस आणि केंद्र प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे सर्रास बाहेरून कॉप्या पुरविल्या जात होत्या. या प्रकाराने जिल्ह्यातील प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

केंद्रप्रमुख, बैठे पथक, पोलिस करतात काय?
प्रत्येक परिक्षा केंद्रांवर केंद्रप्रमुख, बैठे पथक आणि बाहेरील सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. परंतू तेलगावच्या सरस्वती शाळेत हे सर्व नियोजन कोलमडल्याचे दिसले. येथील प्राचार्यांनीही सर्व काही सुरळीत होते, असा दावा केला आहे. तर बाहेरून कॉपी पुरविल्याच्या आरोपाचे खंडण करत पाेलिसांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्यामुळे शाळेच्या प्राचार्यांची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

गैरप्रकाराबाबत संशय वाढला 
आमच्याकडे सुरळीत परिक्षा सुरू आहे. कसलाही गैरप्रकार झाला नाही. पोलिसांचेही योग्य नियोजन होते, असे सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य शिंदे यांनी सांगितले. इतर काही प्रश्न विचारण्याआधीच त्यांनी फोन कट केला. त्यानंतर वारंवार संपर्क केला असता त्यांनी फोन घेतला नाही. प्राचार्य शिंदे यांनी बोलण्यास टाळाटाळ केल्याने गैरप्रकाराबाबत संशय वाढला आहे.

Web Title: Copies in HSC exam center of Telgaon's Saraswati Vidyalaya; Copies to students provided through windows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.