कोरोना; २०२१ मध्ये रुग्णसंख्येने तिसऱ्यांदा ओलांडले अर्धशतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:03 AM2021-02-21T05:03:22+5:302021-02-21T05:03:22+5:30
बीड : २०२१ या चालू वर्षात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने तिसऱ्यांदा अर्धशतक ओलांडले आहे. शनिवारी आणखी ५१ नवे रुग्ण आढळले, ...
बीड : २०२१ या चालू वर्षात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने तिसऱ्यांदा अर्धशतक ओलांडले आहे. शनिवारी आणखी ५१ नवे रुग्ण आढळले, तर एक कोराेनाबळी गेला. १८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात २०२० मध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. या वर्षात नव्या आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कायम ५० पेक्षा कमी होते. या वर्षात २१ जानेवारी आणि ४ फेब्रुवारी या दोनच दिवशी रुग्णसंख्या ५० पेक्षा जास्त आढळली होती. शनिवारी आणखी जिल्ह्यात दिवसभरात ४३६ संशयितांची चाचणी करण्यात आली. यातील ३७८ अहवाल निगेटिव्ह आले, तर ५८ पॉझिटिव्ह आढळले. नव्या रुग्णांमध्ये अंबाजोगाई १३, आष्टी ३, बीड २५, धारूर २, केज ४, माजलगाव ३, परळी ४, पाटोदा २, शिरूर २ येथील रुग्णांचा समावेश आहे, तसेच शनिवारी अंबाजोगाई तालुक्यातील नागझरी परिसरातील ८५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता एकूण बाधितांची संख्या १८ हजार ३६३ इतकी झाली आहे. पैकी १७ हजार ५४४ कोरोनामुक्त झाले असून, ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.
धोका वाढतोय, काळजी घ्या
अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. लॉकडाऊन उघडल्यानंतर नागरिक गाफील झाले होते. मास्क वापरत नाहीत. सोशल डिस्टन्स ठेवत नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. कोरोना नियमांचे पालन न केल्यानेच रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे अद्यापही धोका संपलेला नाही. सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.