कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:49+5:302021-06-19T04:22:49+5:30
------ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात आम्ही मोसमी फळांवर जास्त भर दिलेला आहे. राेजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा वापरतो. मागील ...
------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात आम्ही मोसमी फळांवर जास्त भर दिलेला आहे. राेजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा वापरतो. मागील सव्वा वर्षांपासून हॉटेलचे अथवा बाहेरचे एकही खाद्यपदार्थ मागविले नाही, आणलेले नाही आणि खाल्लेदेखील नाही. दोन्ही उन्हाळे गेले आइस्क्रीमदेखील टाळले आहे. - शारदा प्रशांत आंबेकर, बीड
----------
रोजच्या आहारात पालेभाज्या, सुकामेवा, भोपळा ज्यूसचा वापर करतो. बाहेरचे तेलकट-तुपकट खात नाहीत. सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड्रिंगसुद्धा टाळलेले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे खाद्यपदार्थ खातो. डार्क चॉकलेट, मोड आलेल्या कडधान्याचा वापर जास्त प्रमाणात होतो. सुकामेवा भिजवून खातो, त्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. - सुप्रिया अनिल अष्टपुत्रे
------------
रोजच्या आहारात मोड आलेल्या मटकीचा वापर नेहमी करत आहोत. ॲसिडिटीचा त्रास टाळण्यासाठी तुरीऐवजी पौष्टिक मूग डाळीचे वरण केले जाते. साजूक तुपाचा आहारामध्ये समावेश केलेला आहेच. तिखट तसेच मसाल्याचे प्रमाण कमी केले आहे. पालेभाज्या दोन्ही वेळच्या जेवणात असतात. चहामध्ये दुधाऐवजी गवती चहा, लिंबू, पुदिना तुळशीचा वापर करतो. - मंजूषा सोनवणे पवार
----------------
फास्ट फूडवर अघोषित बंदी
वडापाव, पिझ्झा, बर्गर, पावभाजी, मन्च्युरियन, चायनीज फूड, बेसन, मैद्याचे पदार्थ अनेकजण टाळू लागले आहेत. कोरोनामुळे हॉटेल, फास्ट फूड सेंटर बंदच होते. आता सुरू झाली असली तरी असे पदार्थ खाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. शक्यतो बाहेरचे, हॉटेलचे पदार्थ टाळले जात आहेत.
------
मोड आलेले कडधान्य, पालेभाजी, पनीर, सोयाबीनवर भर
आले, दालचिनी, लवंग, काळेमिरे, सुंठेचा चहामध्ये वापर वाढला आहे. इम्युनिटी वाढण्यासाठी आवश्यक मोड आलेले कच्चे कडधान्य खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सकाळच्या अल्पाेहारातून पोहे कधी कधी होतात.
सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, लसणाचा वापर आहारात वाढला आहे. दही, ताक, पनीर, सोयाबीनचा वापर वाढला आहे. आवळ्याचे लाेणचे, मुरब्बा, शुद्ध तुपाचा वापर होऊ लागला आहे. घरीच कमी तेलाचे खाद्यपदार्थ इडली, दोसा, अप्पे, धिरडे, गूळ, वेलची, सुकामेव्याचा वापर करून बनविलेल्या पदार्थांवर भर दिला जात आहे.