कोरोनाचे पुन्हा आठ बळी; १०१८ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:30 AM2021-04-14T04:30:55+5:302021-04-14T04:30:55+5:30
कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून रुग्णसंख्येबरोबरच मृत्युसंख्याही वेगाने वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि. ...
कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून रुग्णसंख्येबरोबरच मृत्युसंख्याही वेगाने वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि. १२) दिवसभरात चार हजार १८३ जणांची चाचणी केली गेली. त्याचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यात ३ हजार १६५ जण निगेटिव्ह आले; तर १ हजार १८ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. अबाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात २४३, बीड २१६, केज ११९, आष्टी ९८, धारूर २८, गेवराई ५०, माजलगाव ३४, परळी १४०, पाटोदा ५६, शिरूरमध्ये २० तर वडवणी तालुक्यात १४ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात आठजणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यामध्ये केज तालुक्यातील गांजी येथील ६८ वर्षीय पुरुष, गांजपूर येथील ६० वर्षीय पुरुष, लाडेवडगाव येथील ७० वर्षीय पुरुष, पळसखेडा येथील ६५ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई तालुक्यातील बोधीघाट येथील ७४ वर्षीय पुरुष व मेडिकल कॉलेज अंबाजोगाई येथील ५० वर्षीय पुरुष, गेवराईतील सावतानगर येथील ७५ वर्षीय महिला आणि बीड शहरातील अयोध्यानगर येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आता जिल्ह्यातील बाधितांचा एकूण आकडा ३४ हजार ६१ इतका झाला आहे. पैकी २९ हजार ६०६ जण कोरोनामुक्त झाले असून, ७२२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्याधिकारी आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.