कोरोनामुळे मास्क बनले उदरनिर्वाहाचे साधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:29+5:302021-04-21T04:33:29+5:30
अंबाजोगाई : पूर्वी तोंडाला मास्क लावला की, सर्व जण संशयाने तर कधी कुतूहलाने पाहायचे. पण आता कोरोनाच्या ...
अंबाजोगाई : पूर्वी तोंडाला मास्क लावला की, सर्व जण संशयाने तर कधी कुतूहलाने पाहायचे. पण आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने प्रत्येकास मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे बाजारपेठेत विविध प्रकारचे मास्क उपलब्ध झाले आहेत. तर काही व्यावसायिकांचे मास्क हे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.
कोरोनाच्या साथीपूर्वी मास्कचा वापर अत्यंत क्वचित प्रमाणात केला जात असे. प्रामुख्याने रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी मास्कचा वापर ऑपरेशन थिएटरमध्ये वावरत असताना करत असत. डॉक्टारांशिवाय अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय एखाद्याने मास्क लावल्याचे दिसून आल्यास त्याच्याकडे मोठ्या कुतूहलाने पाहिले जात असे. मात्र, जेव्हा कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हापासून मास्कचा वापर सर्वांसाठीच बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व जण घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच आता मॅचिंगचे मास्क खरेदी करण्याकडे शहरवासीयांचा मोठा कल निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता मास्क वापराकडे जे दुर्लक्ष करतील अशा नागरिकांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न वापरणाऱ्याला किमान ५०० रुपये तरी दंड भरावा लागतो. हा दंड टाळण्यासाठी का होईना मास्कचा वापर सक्तीचा झाला आहे.
विविध प्रकारचे मास्क बाजारात उपलब्ध
सध्या बाजारात विविध डिझाइन्सचे एन-९५ व विविध कंपन्यांचे टु-लेअर, थ्री लेअर अशा विविध प्रकारचे मास्क उपलब्ध झाले आहेत. पाच रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंतचे मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक अशा कार्टूनचे मास्कही बाजारात आले आहेत. तरुण-तरुणीही आपल्याला आवडतील अशा वेगवेगळ्या वयोगटांनुसार वेगवेगळ्या प्रकारचे मास्क खरेदी करू लागले आहेत.
मास्क निर्मितीतून रोजगार
लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार संपुष्टात आले. तर अनेक महिला बेरोजगार झाल्या. प्रामुख्याने ज्या महिलांना शिवणकाम येते अशा महिलांनी मास्क बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. घरी विविध प्रकारचे रंगीत कपडे आणून पाहिजे तशा आकाराचे रंगीबेरंगी मास्क शिवून विक्रीसाठी द्यायचे हा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून जोमाने सुरू झाल्याने मास्कनिर्मिती हे अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.