Corona In Beed : संतापजनक ! निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करत असलेल्या कामगारास रॉडने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 04:51 PM2020-03-27T16:51:33+5:302020-03-27T16:53:14+5:30
फवारणी करत असताना पाठीमागून डोक्यात रॉड मारला
केज : देशात व राज्यात कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने प्रशासनाच्या वतीने योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील लहुरी ग्रामपंचायतच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने शुक्रवारी गावात ग्रामपंचायतच्या दोन कर्मचारी वर्गासह दोघांना मजुरीने लावून गावात सोडियम हायड्रो क्लोराइडची फवारणी सुरू केली . यावेळी रोजंदारी कामगारास चार ते पाच जणांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे दरम्यान हि मारहाण कोणत्या कारणामुळे झाली याची माहिती समजू शकली नाही या प्रकरणी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
देशात व राज्यात कोरोना विषाणूचे संकट आल्याने या संकटाचा सामना प्रशासन विविध उपाययोजना राबवून करत आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील लहुरी गावातील ग्रामपंचायतने गावातील स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. गावातील कचरा व नाल्याची साफसफाई जेसीबीने करून गावात ग्रामपंचायतच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मार्फत गावातील चार प्रभागा मध्ये शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायतचे शिपाई वचिष्ट वायकर,बाळासाहेब कांबळे यांच्यासह रोजंदारीने फवारणी करण्यासाठी लावलेले कोंडीराम शिंपले व गणेश चाळक हे गावातील नाली ओटे यांच्यावर सोडियम हायड्रो क्लोराईड ची फवारणी करत होते , गणेश चाळक हा प्रभाग क्रमांक दोन मध्ये फवारणी करत असताना त्याच्या डोक्यात पाठीमागून रॉड मारून त्यास जखमी करण्यात आले हि मारहाण चार ते पाच जणांनी केल्याची सांगण्यात येत आहे.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गणेश नागनाथ चाळक यास उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गणेश यास मारहाण कोणत्या कारणाने व का करण्यात आली याची माहिती मिळू शकली नाही , दरम्यान गणेश चाळक यास मारहाण झाली असून या प्रकरणी अद्याप पर्यंत केज पोलिसात गुन्हा दाखल कारणात आला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली आहे.
झालेला प्रकार चुकीचा - ललिता चाळक
गावातील चार प्रभागामध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने ग्रामपंचायतचे दोन कर्मचारी व रोजंदारीवरील दोघेजण फवारणी करत असताना फवारणी करत असलेल्या गणेश चाळक या मजुरास मारहाण करण्यात आली हा प्रकार चुकीचा आहे गणेश याने मुंबई पुण्याहून गावात आलेल्या शंभर जणांना रिक्षाने रुग्णालयात नेऊन तपासणी करून आणले आहे गावात आज ३५ जण होम क्वारंटाईन आहेत झालेला प्रकार हा चुकीचा असून यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे असे ग्रामपंचायतच्या सरपंच ललिता चाळक यांनी म्हटले आहे