कोरोनामुळे एसी खरेदीला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:32 AM2021-04-06T04:32:21+5:302021-04-06T04:32:21+5:30
मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे मोठ्या कालावधीसाठी दुकाने बंद राहिली. इच्छा असतानाही अनेकांना विविध प्रकारच्या ...
मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे मोठ्या कालावधीसाठी दुकाने बंद राहिली. इच्छा असतानाही अनेकांना विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करता आल्या नाहीत. त्यामुळे घरात असलेल्या पंखा व जुन्या कूलरचाच आधार नागरिकांना घ्यावा लागला. मात्र, यावर्षी मार्चपासूनच कूलर दुरुस्ती व नवीन कूलरच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. एअर कंडिशन कोरोनाच्या प्रादुर्भावास धोकादायक ठरते. अशा स्थितीत वातावरणात थंडावा निर्माण करण्यासाठी हाय स्पीडचे फॅन व कूलरला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे. शहरी भागात नागरिक दुपारी थंड हवेत आराम करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे तापमानापासून संरक्षणासाठी कूलर फायदेशीर ठरतात. बाजारातही विविध प्रकारचे कूलर्स विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. नागरिकांनीही हायस्पीड फॅन व कूलर खरेदीला मोठ्या संख्येने प्राधान्य दिले आहे.