दुसऱ्या वर्षीही खरीप हंगामावर कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:34 AM2021-05-10T04:34:00+5:302021-05-10T04:34:00+5:30
राजेश राजगुरू लोकमत न्यूज नेटवर्क तलवाडा : कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले आहे. असे असताना अवघ्या महिन्याभरावर आलेल्या ...
राजेश राजगुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
तलवाडा : कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले आहे. असे असताना अवघ्या महिन्याभरावर आलेल्या खरीप हंगामावर मागील वर्षीप्रमाणे संकट आहे. या चिंतेत शेतकरी सापडला आहे. सरकारला मात्र दुसऱ्या वर्षीही अनुदान, विमा, गारपिटीची भरपाई, कर्जमाफीचा विसर पडलेला दिसत आहे. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे.
गतवर्षीच्या मुबलक पावसामुळे पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली होती. यात टरबुज, खरबुज, काकडी, टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकांचा समावेश होता; पण गतवर्षीप्रमाणे याही वेळी ऐन पीक पदरात पडतानाच कोरोनाच्या संचारबंदीमुळे लाखमोलाची पिके कवडीमोल दरात विकावी लागली. परिणामी खर्चही निघाला नसल्याने शेतकरी पुन्हा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने कापूस, तूर, सोयाबीनचे ऊत्पन्न घटले. इतर पिकांना लाखोंचा खर्च करून पदरात काहीच न पडल्याने शेतकऱ्यांचे अवसानच गळाले आहे. खरीप अवघ्या महिनाभरावर आला असताना बी-बियाणे कसे घ्यावे या विचारात असलेले शेतकरी मशागत करून पुन्हा निसर्गावर आशा ठेवून आपले भविष्य आजमावणार आहेत.
....
कोरोनात कर्जमाफीही लांबली
कोरोनाने जगातील प्रत्येक घटकाचे नुकसान केले; पण यात शेतकरी मात्र पुरता कोलमडल्याचे दिसत आहे. लाखाचे पीक रुपयात आले. कर्जमाफी होऊन नवीन कर्ज मिळेल ही अपेक्षाही लांबली. काही काम करावे, तर तेही जमत नसल्याने शेतकरी मशागतीला पैसे नसल्याने सावकाराच्या दारात उभा राहिला आहे.
.....
अनुदान, खरीप विमाही मिळेना..
गेवराई तालुक्यातील काही गावांना गतवर्षीच्या अतिवृष्टीचे अनुदान अजून वाटप झालेले नाही, तर काही गावांना दुसऱ्या टप्प्याचे अनुदान येणे बाकी आहे. गतवर्षी अतिवृष्टीने पिके मातीमोल झाली. पण, विमा कंपनीकडून जाचक अटीमुळे अजूनही पदरात काहीच पडलेले नाही. त्यातच कर्जमाफीत उशिरा नाव आलेले अजून कर्जापासून वंचित आहेत. गेल्या महिन्यात तालुक्यातील अनेक गावांत गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ती मदतही कोरोनात अडकली असल्याचे चित्र आहे. असे असताना यंदाही खरीप हंगामाची सुगीही कर्ज काढूनच करावी लागण्याचे चिन्हे आहेत.