बीड जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांतील कोरोना डेथ ऑडिट सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 07:26 PM2020-11-11T19:26:18+5:302020-11-11T19:27:31+5:30
बीड शहरातील ‘लोटस’सह सात रुग्णालयांचा समावेश, समितीकडून चौकशी सुरू
बीड : बीड शहरातील लोटससह इतर सात रुग्णालयांत कोरोनामुळे रुग्णांचे मृत्यू झाले होते. पैसे खर्चूनही रुग्णांचा जीव जात असल्याने संताप व्यक्त होत होता. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. यावर आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयांतील डेथ ऑडिट सुरू केले आहे. यामुळे डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होत आहे; परंतु मागील तीन महिन्यांपूर्वी बाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे खाजगी रुग्णालये अधिगृहित केली होती. त्यांना कोविड सेंटर घोषित केले होते. यात सर्वात अगाेदर लोटस हॉस्पिटल अधिगृहित केले. त्यामुळे येथे रुग्ण दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली होती. याच लोटस रुग्णालयात आतापर्यंत तब्बल ९ जणांचा बळी गेला आहे.
बिलांचेही ऑडिट व्हावे
डेथ ऑडिटप्रमाणेच रुग्णांकडून आकारलेल्या बिलांचेही ऑडिट करण्याची गरज आहे. १० दिवस रुग्णालयात ठेवून अवास्तव बिले घेतल्याच्या अनेक तक्रारी आहेत. आरोग्य विभागाने याचीही माहिती घेऊन ऑडिट करावे, अशी मागणी सामान्यांमधून होत आहे.
कागदपत्रांसह माहिती संकलित
खाजगी रुग्णालयातील मृत्यूचा वाढता आकडा पाहून ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते. यावर आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयांतील डेथ ऑडिट करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी समितीने सर्व कागदपत्रे आणि आवश्यक माहिती संकलित केल्याचे सांगण्यात आले. डेथ ऑडिट होणार असल्याने या रुग्णालय चालकांचे धाबे दणाणले आहे.
खाजगी रुग्णालयांतील डेथ ऑडिट करण्यास सुरुवात झाली आहे. सर्व कागदपत्रे आणि माहिती घेतली आहे. यावर समितीकडून अहवाल तयार होईल. दोन दिवसांत यावर निर्णय घेतला जाईल. त्यानंतरच कोणी दोषी आहे की नाही, हे समजेल.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड